‘पर्यावरण वारी’तून पर्यावरण संवर्धनाचा प्रसार गावोगावी व्हावा

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ या उपक्रमाचा समारोप, जग वाचवण्याचा संतांचा संदेश

पंढरपूर –  ‘पर्यावरणाची वारी, पंढरपूरच्या दारी’ हा उपक्रम १६ वर्षापासून अत्यंत प्रभावीपणे राबवला जात आहे. या माध्यमातून आळंदीपासून ते पंढरपूरपर्यंत पर्यावरण संवर्धनासाठी प्रबोधन केले जात आहे. आपल्या सर्व संतांनी पर्यावरणाची पूजा, रक्षण व संवर्धन करून जग वाचवण्याचा संदेश दिला. हा संदेश अनुसरत सर्व विठ्ठल भक्तांनी वारीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश गावोगावी घेऊन जावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री फडवणीस म्हणाले, वातावरणातील बदलामुळे पर्यावरणाचा ऱ्हास  होत असून जल, वायू व वनराईचे महत्त्व समजून न घेतल्यास जग विनाशाकडे जाईल. त्यामुळे पर्यावरणाच्या जागर हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण असून या माध्यमातून पर्यावरणाचे संवर्धनासाठी जनजागृती केली जात आहे. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली महाराजांनी हिरवी वनराई फुलवण्याचे आवाहन केले तर जगद्गुरु संत तुकाराम यांच्या  ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या अभंगातून निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला. हा संदेश घरोघरी पोहोचवीत आपल्याला वनराई वाढवायची आहे, प्रदूषण कमी करायचे आहे. यासाठी प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संवर्धनातील आपली जबाबदारी ओळखून वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे, अमृता फडणवीस, सोनिया गोरे, आमदार समाधान आवताडे, आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील आदी भजनाचा टाळ वाजवत ठेका धरत ‘ज्ञानोबा तुकाराम’, ‘जय जय राम कृष्ण हरी’ असा गजर करत वारकरी यांच्या समवेत भक्तीरसात दंग होऊन गेले.