प्रेमसंबंध संपवले, मग युवतीवर कोयत्याने हल्लाचा प्रयत्न…बघा पुण्यात नेमकं घडतंय काय ..?

पुणे शहर शिक्षणाचे माहेरघर आहे. राज्याची नाही तर देशाची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे शहराची ओळख आहे. परंतु पुणे शहराची वाटचाल आता पश्चात्य संस्कृतीकडे होऊ लागली आहे. एकतर्फी प्रेमातून हल्ले करण्याचे प्रकार पुण्यात वाढू लागले आहेत.  प्रेमसंबंध संपवल्याच्या रागातून भरदिवसा अकरावीत शिकणाऱ्या युवतीवर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. सोमवारी दुपारी सुभाषनगर येथील गल्ली क्रमांक 6 मध्ये ही घटना घडली. यावेळी महिलांनी आरडा-ओरडा केल्यामुळे दुचाकीवरुन आलेले आरोपी पळून गेले.

पुणे येथील महेश सिद्धप्पा भंडारी (वय.22,रा. जनता वसाहत) याचे एका अकरावीत शिकणाऱ्या मुलीवर प्रेम होते. ती मुलगी बोलत नाही, तिने प्रेमसंबंध संपवले, या रागातून महेश आणि आणखी एकाने तिला भररस्त्यात अडवले. तिच्यावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या महिलांना आरडाओरड केली. यामुळे दुचाकीवरुन आलेले हे दोघे तरुण पळून गेले. परंतु जाताना त्यांनी चांगलाच गोंधळ घातला.

एका व्यक्तीला कोयता दाखवत धमकवले. कोयता फेकत दहशत निर्माण केली. कोयता हल्ला करण्याचा प्रयत्न करणारा तरुण तळजाई टेकडी परिसरात पळून गेला होता. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. मुलगी बोलत नसल्यामुळे हा प्रकार केल्याचे त्याने प्राथमिक चौकशीतून सांगितले. त्याच्यासोबत असणाऱ्या दुसऱ्या आरोपीचा शोध घेतला जात आहे. महेश जनता वसाहतीत राहत आहे. हा सर्व प्रकार सुभाषनगर भागात घडल्यानंतर या परिसरात दहशतीचे वातावरण आहे.