केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली.२० नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या सर्व २८८ जागांवर मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. तर झारखंडला १३ आणि २० नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांत निवडणूक होणार आहे.
महाराष्ट्रात दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली. या गोळीबारात बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत निवडणूक आयुक्तांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले “आम्ही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.आम्ही स्पष्ट सांगतो, पोलीस आणि प्रशासनाला सांगतो, कोणत्याही प्रकारची हिंसा आणि गुन्हेगारी होता कामा नये. आम्ही सख्त सूचना दिल्या आहेत. कोणत्याही प्रकारची हिंसा आणि कोणत्याही प्रकारचा हल्ला कोणत्याही राजकीय नेत्यावर होता कामा नये”, असे आदेश मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिले आहेत.
महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान होणार असून,२३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. तसेच, ४ नोव्हेंबरला निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असणार आहे. यंदा महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक असणार आहे.