राज्यात रोज आठ शेतकरी करत आहेत आत्महत्या

गेल्या वर्षी इतक्या हजार शेतक-यांनी संपवले जीवन, सरकारची कबुली, तरी कर्जमाफी नाहीच

मुंबई – गेल्या ५६ महिन्यांत राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करताहेत, ही माहिती अंशत: खरी आहे, अशी कबुली राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिवाजीराव गर्जे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विधान परिषदेत याबाबत प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना मकरंद जाधव यांनी ही माहिती दिली आहे. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत विदर्भ आणि मराठवाड्यात तब्बल २,७०६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. राज्यातील दोन प्रमुख विभागांत शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण अधिक आहे. अमरावती विभागात १,०६९, तर छत्रपती संभाजीनगर विभागात ९५२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. जिल्हानिहाय बोलायचे झाल्यास बीड जिल्ह्यात २०५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून अमरावती जिल्ह्यात २००, अकोल्यामध्ये १६८ आणि वर्धा जिल्ह्यात ११२ शेतकऱ्यांची आपले जीवन संपवले आहे. २,७०६ प्रकरणांपैकी १,५६३ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली होती. त्यापैकी १,१०१ शेतकऱ्यांना ३० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य धनादेशाद्वारे प्राप्त झाले असून बँकेच्या आर्थिक उत्त्पन्न योजनेद्वारे ७० हजार रुपये जमा झाले आहेत. राज्यामध्ये शेतकऱ्यांबाबत ही परिस्थिती निर्माण झाल्यामुळे विरोधक सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत आहेत.

राज्य सरकार महिलांसाठी लाडकी बहिणी योजना आणून आर्थिक सहाय्य करत आहे. परंतु दुसऱ्या बाजूला याच राज्यातील शेतकऱ्यांकडे सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.