खेळाडूंना अधिकाधिक दर्जेदार व अद्ययावत सुविधा पुरविण्याचा प्रयत्न

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन, जागतिक बुद्धिबळ विश्वविजेती ग्रँडमास्टर दिव्या देशमुखचा नागरी सत्कार

नागपूर – महाराष्ट्र शासनाने क्रीडा क्षेत्राला कायम प्राधान्य दिले आहे. खेळाडूंना मोठी ध्येय खुणावत असून यासाठी तंत्रशुध्द प्रशिक्षण, सकस आहार, परदेशी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन या गोष्टी आवश्यक आहे. जागतिक स्तरावरील स्पर्धांमध्ये यश मिळवायचे असल्यास या गोष्टी  आवश्यक आहे.  खेळाडूंना अधिकाधिक दर्जेदार व अद्ययावत सुविधा पुरविण्याचा प्रयत्न आहे. दिव्या देशमुखने जागतिक स्पर्धेत मिळविलेले देदीप्यमान यश हे  देशातील हजारो मुला-मुलींसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

जागतिक बुद्धिबळ स्पर्धा विश्वविजेती ग्रँडमास्टर दिव्या देशमुखचा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने  नागरी सत्कार कविवर्य सुरेश भट सभागृह येथे आयोजित करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दिव्याचा सन्मान करीत तीन कोटी रुपयांचे बक्षीस प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेकडूनही ११ लाख रुपयांचे बक्षिस प्रदान करण्यात आले. तसेच खासदार क्रीडा महोत्सव समितीकडून सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, दिव्याने कमी वयात लक्ष विचलित न होऊ देत ध्येयावर लक्ष केंद्रीत केले. बुद्धिबळात उत्स्फुर्तता, एकाग्रता आणि सजगता आवश्यक असते. बुद्धिबळ हा खेळ शंभरावर देशात खेळला जातो. त्यामुळे दिव्याने गाठलेले यश मोठे आहे. बुद्धिबळात चीनचे वर्चस्व राहायचे. चीनचे हे वर्चस्व जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख हिने धडक देत मोडून काढले. यात दिव्याने अंतिम फेरीत वयाच्या केवळ १९ व्या वर्षी विजय मिळविला.
तिने कमी वयात मोठी उंची गाठली असून देशातल्या हजारो मुला-मुलींनी प्रेरणा मिळावी यासाठी हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दिव्याचे हे यश हजारो मुला मुलींसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. दिव्या देशमुख हिने आपले मनोगत व्यक्त केले. राज्य शासनाचे बुद्धिबळ स्पर्धा विश्वविजेती होण्यासाठी मोलाचे सहकार्य मिळाले. नागपूर हे शहर माझ्यासाठी विशेष आहे. या सत्कार कार्यक्रमासाठी नागपूरकरांचे आभार मानते. या यशानंतर पुढील जागतिक स्पर्धांसाठी आणखी जोमाने तयारी करणार असल्याचे तिने सांगितले.

क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे म्हणाले की, यशस्वी खेळाडू घडताना त्यांच्यामागे असलेले कुटुंब, प्रशिक्षक आणि व्यवस्थाही तितकीच महत्वाची असते. त्यामुळे त्यांचाही या यशात मोलाचा वाटा आहे. मुलींना संधी, योग्य प्रशिक्षण आणि प्रेरणा दिल्यास त्या जग जिंकू शकतात. दिव्याने हे परिवर्तन सिद्ध करून दाखविले आहे. हे यश सर्वांसाठी आदर्शवत असल्याचे क्रीडा मंत्री श्री. कोकाटे यावेळी म्हणाले. राज्य शासनाच्या माध्यमातून संधी तसेच निधी खेळाडूंना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.