नाकाबंदी दरम्यान विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीस्वाराची पोलिसांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की; मोटारसायकलस्वाराला अटक

नाकाबंदी दरम्यान विरुद्ध दिशेने आलेल्या मोटारसायकलस्वाराला थांबून ब्रेथ अ‍ॅनालायझरद्वारे तपासणी करण्यास सांगितले. तेव्हा त्याने पोलिसांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की करणार्‍या मोटारसायकलस्वाराला पोलिसांनी अटक केली आहे.

मधुकर सरदारसिंग ठेंग ऊर्फ पाटील असे या मोटारसायकलस्वाराचे नाव आहे. याबाबत पोलीस अंमलदार गोकुळ भोसले यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार मगरपट्टा मेनगटजवळ १० ऑक्टोंबर रोजी मध्यरात्री सव्वाबारा वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे नाकाबंदीच्या कर्तव्यावर असताना मगरपट्टा मेनगेटवर होते. यावेळी एक मोटारसायकलस्वार विरुद्ध दिशेने आला. पोलिसांनी त्याला थांबवून लायसन्स दाखविण्यास सांगितले. त्याने मद्यपान केल्याचा संशय आल्याने ब्रेथ अ‍ॅनालायझर मशीनद्वारे तपासणी करण्यास सांगितले. त्यास त्याने नकार देत त्यांनी शिवीगाळ केली. पोलीस पैसे मागतात, असे बोलून पोलिसांची बदनामी केली. फिर्यादी व पोलीस निरीक्षक खांडे यांनी त्यास समजावण्याचा प्रयत्न केला. तरीही त्याने शिवीगाळ करुन त्यांच्या अंगावर धावून येऊन त्यांची कॉलर पकडून त्यांना धक्काबुक्की केली. पोलिसांनी मधुकर ठेंग याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक बर्गे तपास करीत आहेत.