(प्रतिनिधी – प्रियंका बनसोडे) – फ्लोराअॅक्टीव्ह या परदेशी कंपनीचा शॅम्पो, कंडिशनर, डब्ल्यु वन नॅनोप्लॉस्टिक ट्रीटमेंट तसेच तसेच लक्स लीझ केरेटीन केंन्डिशनल, शॅम्पो यांची ही उत्पादने कॉपीराईट कायद्याचा भंग करुन बनावट तयार करुन त्याची विक्री करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे.पिंपरी पोलिसांनी २७ लाख ५१ हजार ६०० रुपयांचा बनावट माल जप्त केला आहे.
याबाबत संदिप हरीष गिडवानी यांनी पिंपरी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दुकानमालक विरेंद्र रामलखन यादव याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पिंपरीतील रिव्हर रोडवरील क्रिष्णा कॉसमेटीक या दुकानात गुरुवारी सायंकाळी करण्यात आली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शिमेर्स नावाच्या कंपनीत कामाला आहेत. कंपनीकडे असलेल्या कॉपीराईट व ट्रेडमार्कचा कोणी भंग करत असेल तर त्यावर कारवाई करण्याचे अधिकार आहेत. पिंपरीतील क्रिष्णा कॉसमेटिक कंपनीमध्ये फ्लोराअॅक्टीव्ह या परदेशी कंपनीच्या व लक्स लीस या कंपनीची बनावट उत्पादने तयार करुन त्याची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यांनी याची माहिती पिंपरी पोलिसांना दिली.
पोलीस निरीक्षक धनंजय कापरे व तपास पथकातील पोलिसांनी या दुकानावर छाप घातला. त्यात फ्लोरोअॅक्टीव्ह डब्ल्यु वन शॅम्पो, फ्लोअॅक्टीव्ह डब्ल्यु वन कंपनीचे थ्री इन वन केंडीशनर, नॅनोप्लॉस्टिक ट्रीटमेंट बॉक्स, लक्स लीझ केरेटीन शॅम्पो, लक्स लीझ केरेटीन ट्रीटमेंट बॉक्स, लक्स लीझ केरेटीन कॅन्डीशनल, फ्लोराअॅक्टीव्ह कंपनीचे स्टीकर असलेल्या रिकाम्या बाटल्या, लक्स लीझ कंपनीचे स्टीकर असलेल्या बाटल्या, दोन्ही कंपनीचे बनावट स्टीकर असलेल्या ७ पेपर शीट, बनावट बारकोड असलेल्या २ पेपर शीट असा २७ लाख ५१ हजार ६०० रुपयांचा माल पकडण्यात आला. पोलीस निरीक्षक धनंजय कापरे तपास करीत आहेत.