लोणी काळभोर येथील शेतकरी आत्महत्यामुळे परीसरात हळहळ, शेतक-यामध्ये संतापाची भावना

लोणी काळभोर प्रतिनिधी – चंद्रकांत दुंडे | सधन परीसर समजल्या जाणाऱ्या हवेली तालुक्यातील लोणी काळभोर येथील कर्जबाजारीपणाला  कंटाळून एका ४५ वर्षीय शेतकऱ्याने दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील रुपनर वस्ती परिसरात शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. यामुळे लोणी काळभोर परिसरात शोककळा पसरली आहे

मल्हारी महादू रुपनर ( वय ४५ रा.लोणी काळभोर, ता. हवेली, पुणे) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मल्हारी रुपनर यांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. शेती व्यवसायावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.गेल्या चार ते पाच वर्षापासून शेती व्यवसाय अखेरच्या घटका मोजत आहे.खते, बि बियाणे, मजुरी, यांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत परंतु कष्टाने पिकवलेल्या शेतमालाच्या किमती मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून जैसे थे आहेत.कित्येक वेळा बाजारभाव  कमी होऊन माल बाजारातच फेकून देण्याची वेळ बळीराजावर येते.जोपर्यंत उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळत नाही.तोपर्यंत बळीराजा वरील संकट कमी होण्याची कोणतीही शक्यता नाही.बागायती परिसरात अशी घटना घडल्याने लोकप्रतिनिधींबद्दल प्रचंड नाराजीचा सुर शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.अशीच परिस्थिती राहीली तर भविष्यात आत्महत्याचे प्रमाण वाढण्याची भीती शेतकरी बांधवांकडुन व्यक्त होत आहे. शेती उत्पन्नातुन संसाराचा उदरनिर्वाह चालविणे तर दूरच परंतु उत्पादनाचा खर्चच निघत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट होत चालली आहे.