दुचाकीवरून चाललेल्या एका सराईत गुन्हेगाराचा पाठीमागून दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी कोयत्याने सपासप वार करुन खून केला. डोक्यात दोन वर्मी घाव बसल्याने सराईत गुन्हेगार गणेश अनिल तुळवे याचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. ही घटना चाकण-तळेगाव मार्गावर खालुंब्रे गावच्या हद्दीत एपची चौकापासून काही अंतरावर सोमवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली.
या प्रकरणी भावकीतील संशयित आरोपी व त्याचा एक साथीदार फरार झाले आहेत. हा खून भावकीच्या वादातून झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाले असून त्यांच्या शोधासाठी पथके रवाना केली असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गौर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश तुळवे हा त्याच्या दुचाकीवरुन त्याच्या भाच्यासह खालुंब्रे येथे त्याच्या घरी चालला होता. दुचाकीवरुन चाललेला असताना तो एचपी चौकापासून काही अंतरावर खालुंब्रेच्या बाजूला जात असताना चाकण-तळेगाव मार्गावर थांबला. त्यावेळी पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोघांनी त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. डोक्यात दोन वार खोलवर गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
गणेश तुळवे हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. तो दोन वर्ष तडीपार होता. काही महिन्यापूर्वी तो गावात आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी चाकण येथे पाठवला. घटनास्थळी पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गौर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांनी भेट दिली.