किरकोळ वादामुळे कामगाराने केला सुपरवायझरवर चाकूने वार

गाडीतून कचरा बाहेर आल्याने तो दाबून घे असे सांगणार्‍या सुपरवायझरवर चाकूने वार करुन जखमी करण्याचा प्रकार समोर आला आहे . ही घटना रहाटणीमधील साई ज्योती पार्क येथे बुधवारी सकाळी साडेसात वाजता घडली.

याप्रकरणी प्रशांत ज्ञानेश्वर ओझरकर, वय ३० यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विवेक संतोष अडागळे, वय २८ आणि अर्जुन गालफडे, वय २६ अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवेक अडागळे आणि अर्जुन गालफडे हे कचरा गाडीवर चालक व कामगार आहेत. कचरा गाडी साई ज्योती पार्क येथे आली होती. त्यावेळी फिर्यादी यांनी गाडीतून कचरा बाहेर आलेला पाहिला. गाडी चालक व कामगारांना कचरा आत दाबण्यास सांगितले. त्यावर अर्जुन गालफडे याने मी कचरा दाबून घेणार नाही. तुला गरज असेल तर तु खाली उतर आणि कचरा दाबून घे, असे म्हणाला. यावर फिर्यादी यांनी मी तुझ्या वरच्या पोस्टवर काम करतो, असे सांगितले. याचा आरोपींना राग आला. विवेक अडागळे याने फिर्यादी यांना पकडले. अर्जुन गालफडे याने कचर्‍यातील घरगुती वापरातील चाकूने फिर्यादी यांच्या हातावर मारुन जखमी केले. शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी तपास करीत आहेत.