पुणेकरांवर ड्रोनची नजर? पुण्यात अज्ञात ड्रोनच्या घिरट्या कायम

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी अज्ञात ड्रोनच्या घिरट्या सुरू झाल्याच्या बातम्या समोर येत आहे. या अज्ञात ड्रोनने पुणेकरांची झोप उडवली आहे. पुण्यातील भोर शहरासह ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी अज्ञात ड्रोनच्या घिरट्या सुरू आहेत.गेल्या आठवडाभरापासून वेगवेगळ्या भागात रात्री ११ ते २ वाजेच्या दरम्यान ड्रोन घिरट्या घालताना दिसतात. दररोज एकाच वेळी ५ ते ६ ड्रोन घिरट्या घालत आहेत. या सगळ्या प्रकारामुळं नागरिकही धास्तावले आहेत.

मागच्या तीन दिवसांपासुन शिरुर तालुक्यातील मलठण, बाभुळसर, कारेगाव, रांजणगाव, बाभूळसर, वरुडे, खंडाळे माथा या परिसरात ड्रोन घिरट्या घालताना दिसुन आले आहेत. तर पुण्यातील मुळशीमध्ये रात्रीच्या वेळी अज्ञात ड्रोन घिरट्या घालत असल्याचं समोर आलं होतं. असाच एक ड्रोन आकाशात घिरट्या घालत असताना भरे गावातील एका ग्रामस्थाच्या घरावर पडल्याची घटना घडली होती. बाभुळसर येथे नागरिकांनी ड्रोन ताब्यात घेऊन पोलीसांच्या स्वाधीन केलं मात्र ड्रोनच्या माध्यमातून ग्रामीण भागात रेकी का केली जाते याचं उत्तर अद्यापही नागरिकांना मिळत नसल्याने नागरिक भितीच्या छायेखाली असून ड्रोनच्या रेकीचा पोलीसांनी तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी केली जाते आहे.

दरम्यान, यावर पोलिसांनीही थेट अॅक्शन घेतली आहे. त्याच्या तपासासाठी एक पथक काम करत आहेत.अँटीड्रोन यंत्रणा आम्ही विकत घेत आहोत. अँटी ड्रोन गनदेखील खरेदी करणार आहोत. ते ड्रोन उतरवल्याशिवाय ते नेमके कुणाचे आणि कोणत्या करण्यासाठी उडत होते ते कळू शकतं नाही. ज्या ठिकाणी असे ड्रोन आढळून येतील त्या ठिकाणच्या नगरिकानी या घटना आमच्या निदर्शनास आणून द्याव्या, असे अवाहन पोलिसांनी केले आहे. तर हे ड्रोन मुलांच्या खेळण्यातील असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. ड्रोनच्या माध्यमातून चोरीसाठी टेहाळणी तर केली जात नाही ना? असा संशय नागरिकांना आहे. पोलिसांनाही अद्याप याचा तपास लागत नसल्याने, ड्रोनचं गुढ कायम. ड्रोन नक्की कोण उडवतयं? त्यामागचा उद्देश कायं?याचा शोध घेण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे.