जेवणानंतर पाणी प्यायला गेला अन् नळालाच चिकटला; 23 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

कृषी महाविद्यालयातील ‘मेस’मधील जलशुद्धीकरण यंत्रातून (आरओ) विजेचा तीव्र धक्का बसल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.

सुरक्षा विषयक उपाययोजनांकडे काणाडोळा आणि गंभीर हलगर्जीपणामुळे हा बळी गेल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात येत असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

चैतन्य कुंडलिक चव्हाण (वय २३, रा. डोंगरगाव, आष्टी, बीड) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो कृषी महाविद्यालयात ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. चैतन्य १४ मार्चला मेसमधील कामकाज पाहत होता. जलशुद्धीकरण यंत्र व्यवस्थित सुरू आहे का, याची तपासणी करताना अचानक यंत्रात विद्युत प्रवाह उतरला. विजेचा धक्का बसल्याने तो जागीच बेशुद्ध पडला. खासगी रुग्णालयात उपचारांदरम्यान मंगळवारी त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर महाविद्यालय प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला.