
(पुणे) – दुचाकीवरुन घरी जाणार्या दोघांना अडवून गुंडाच्या टोळक्याने बेदम मारहाण करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये दोघे जण गंभीर जखमी आहेत. याप्रकरणी गणेश संजय पोळ यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सौरभ तिमप्पा धनगर (सौर्या) आकाश राहुल पंडित ऊर्फ झिंग्या, साहिल राजू वाघमारे ऊर्फ सोन्या यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. ही घटना ताडीवाला रोड येथील मारुती मंदिर चौकात सोमवारी सायंकाळी पावणेसात वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्याचा मित्र रोहन व त्याचा मुलगा रोनिक यांना घेऊन केस कापण्यासाठी गेले होते. केस कापल्यानंतर दुचाकीवरुन घरी परत येत असताना मारुती मंदिर चौकात आरोपींनी त्यांना अडविले. सोन्या याने रोहन याचा मुलगा रोनिक याला उचलून बाजुला घेतले. व ‘हा भाडखाऊ खूप माजला आहे. मारा या हरामखोराला जिवंत सोडू नका,’ असे बोलून शिवीगाळ करु लागला. सौरभ याने खिशातून फायटर काढले. फिर्यादी यांच्या कानावर, हनुवटीवर व कपाळावर मारण्यास सुरुवात केली. इतरांनी लाकडी बांबुने मारहाण केली.

फिर्यादी हे वाचवा वाचवा असे ओरडू लागल्यावर लोक जमा होऊ लागले. तेव्हा सौरभ याने ‘खबरदार, जर कोणी याला वाचविण्यासाठी मध्ये आलात तर तुमच्या जिवाला मुकाल,’ अशी धमकी देऊन दहशत पसरविली. त्यामुळे कोणी पुढे येण्याची हिंमत दाखविली नाही. रोहन याने फिर्यादी यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यालाही मारहाण करुन जखमी केले. फिर्यादी व रोहन हे त्यांच्या तावडीतून सुटून पळून जाऊ लागले. तेव्हा पाठीमागून तिघांनी त्यांच्या दिशेने दगडफेक केली. पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक गर्कळ तपास करीत आहेत.









