तुम्ही चिकन खाता का? मग ही बातमी वाचाच

चिकन खाल्याने होते या आजाराची लागण?, राज्यात या आजाराचे रुग्ण वाढले

पुणे -पुण्यासह राज्यात जीबीएस आजाराने थैमान घातलंय. नागपूरमध्ये ४५ वर्षांच्या एका रुग्णाचा मृत्यू झालाय. यासह राज्यात जीबीएसमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संक्या ९ वर पोहोचली आहे. मुंबई, पुणे सोलापूर, नागपूरमध्ये जीबीएस रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पण आता याबाबत वेगळीच माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जीबीएस आजाराबाबत मोठी माहिती दिलीय. चिकन खाल्ल्याने जीबीएसचा धोका असल्याचं अजित पवार यांनी म्हटले आहे. कमी शिजवलेल्या चिकनमधून जीबीएसचा धोका असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मांस कच्चे, कमी शिवजवलेले खाल्ल्याने जीबीएस होत असल्याचे समोर आले आहे. पण लगेच आता तुम्ही कोंबड्या मारण्याचे जाळून टाकण्याची गरज नाही असंही अजित पवार म्हणाले आहेत. जीबीएस हा आजार पाण्यामुळे झाल्याची चर्चा होती. मात्र कोंबड्यांचे मांस खाऊन झाल्याचे पुढे येत आहे. तसेच डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘जीबीएस हा रोग कुठल्याही जंतू किंवा बॅक्टेरिया किंवा व्हायरसपासून होत नाही. काही विषाणू अन्नपदार्थामार्फत आपल्या शरीरात गेल्यानंतर हा आजार बळावण्याची जास्त शक्यता असते. दूषित पाणी, दूषित अन्न किंवा दूषित मांसाहार याच कारणांमुळे जीबीएस आजार होतो हे निष्पन्न झाले आहे.’ त्यामुळे दूषित मांस किंवा उघड्यावरचे अन्न खाणे टाळा असा सल्ला डॉ.अविनाश भोंडवे यांनी दिला आहे.

जीबीएस आजार झाल्यास व्यक्तीला अचानक पायातील किंवा हातात येणारा अशक्तपणा / दुर्बलता / लकवा येतो. अचानकपणे उद्भवलेला चालण्यातील त्रास किंवा अशक्तपणा, जास्त दिवसांचा अतिसार (डायरिया) आणि ताप अशी लक्षणे जाणवू लागतात.