रिक्षा चालवताय का? मग ही बातमी वाचाच!

आरटीओ कडून नवीन पत्रक जारी, नियम मोडल्यास होणार जबर दंड, अंमलबजावणीसाठी तपास पथके तैनात

पुणे – पुण्यातील रिक्षाचालकांसाठी आरटीओकडून एक मोठा आणि महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. रिक्षाचालकांना आता प्रवास सेवा पुरवत असताना पांढरा शर्ट आणि खाकी पॅंट असा गणवेश बंधनकारक असणार आहे, त्याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले आहे.

शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी रिक्षाचालकांची ओळख पटावी, त्यासाठी महाराष्ट्र कायदा वाहन नियम १९८९ चे नियम २१ पोटनियम १८ मध्ये रिक्षाचालकांनी प्रवाशांना सेवा पुरवताना गणवेश, ओळखपत्र बंधनकारक आहे आहे, पण त्याचे योग्य ते पालन होत नव्हते. पण आता रिक्षाचालकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी स्पष्ट केले आहे. मोटार वाहन कायद्यातील विविध नियमांचा भंग वाहनचालकांकडून केला जातो. त्याअनुषंगाने आरटीओच्या वायुवेग पथकांमार्फत सातत्याने कारवाई केली जात असते. आता फक्त रिक्षाचालकांचा गणवेश, ओळखपत्र आणि त्यांची वैध कागदपत्रांच्या तपासणीसाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. त्याकरिता विशेष पथके तैनात केली जाणार आहेत.

रिक्षाचालकांनी या नियमांचे पालन करावे, अन्यथा या विशेष मोहिमेत नियमभंग केल्याचे आढळल्यास मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई केली जाणार असल्याचेही या पत्रात म्हटले आहे.