
मुंबई – महायुती सरकारने काल खातेवाटप जाहीर केल्यानंतर सोमवारी सर्व मंत्री आपल्या खात्याचा पदभार संभाळणार आहेत. पण आता पालकमंत्री पदासाठी या सर्व मंत्र्यामध्ये सुरु झाली आहे. त्यामुळे कोणाला कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.महत्त्वाचे म्हणजे अनेक मंत्री स्वतः च्या जिल्ह्यासाठी आग्रही असले तरीही अनेकांना दुसरा जिल्हा मिळण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात ३६ जिल्हे आहेत आणि आज राज्याच्या मंत्रिमंडळात ४२ मंत्री आहेत. त्यामुळे काही मंत्र्यांना पालकमंत्री पद मिळण्याची शक्यता कमी आहे. या मंत्रिमंडळात राज्यातील १७ जिल्ह्यांना मंत्रीपद मिळालेले नाही. त्यामुळे या जिल्ह्यांना बाहेरचा पालकमंत्री मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे एकाच जिल्ह्यात दोन किंवा तीन चार मंत्री झाल्याने आपल्याच जिल्ह्यात पालकमंत्री पद मिळावे यासाठी स्पर्धा राहणार आहे. सर्वात आधी रायगडचा पालकमंत्री कोण होणार याची उत्सुकता असणार आहे. कारण भरत गोगावले यांनी आधीच्या सरकारमध्येही पालकमंत्री पदासाठी आग्रह धरला होता. आता याठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या आदिती तटकरे आणि शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांच्यात स्पर्धा असणार आहे. बीड जिल्ह्यात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे की अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे पालकमंत्री होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पुण्यातही चार मंत्री असले तरी खरी स्पर्धा अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात असणार आहे. तर नागपूरचा पालकमंत्री कोण असणार याचीही उत्सुकता असणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वतःकडे घेणार की प्रताप सरनाईक यांना देणार? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. यासह ठाण्याच्या पालकमंत्रीपद भाजपच्या गणेश नाईक यांचं ही नाव चर्चेत आहे. त्यामुळे येथेही स्पर्धा असणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट की अतुल सावे पालकमंत्री होणार? हे पहावे लागेल. जळगावात देखील महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्यात स्पर्धा असणार आहे. त्यामुळे कोणचा मंत्री कुठला पालकमंत्री होणार? यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

एक-दोन दिवसात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांची बैठक होईल आणि पालकमंत्र्यांसंदर्भात निर्णय होईल”, असे शंभुराज देसाई म्हणाले आहेत. पालकमंत्री पदावरून आमची कोणतीही रस्सीखेच नाही. प्रत्येकाला वाटतं की आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळावे. पण याचा सर्वस्वी निर्णय आमचे नेते घेतील, असेही देसाई म्हणाले आहेत.









