
मराठा समाजाच्या न्याय मागण्यास आमदार म्हणुन पाठींबा, आरक्षण मागणीबाबत लवकर कार्यवाही करण्याची मागणी

बार्शी – मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा आणखी तीव्र झाला असून मनोज जरांगे पाटील २९ ऑगस्टपासून आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणास महाविकास आघाडीचे अनेक आमदार, खासदार आपला पाठिंबा जाहीर करत आहेत. आता, बार्शीचे आमदार आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते दिलीप सोपल यांनी आझाद मैदानातील आंदोलनास आपला पाठिंबा जाहीर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आरक्षण मागणीबाबत लवकर कार्यवाही करावी, असे त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पहिल्याच दिवशी आंदोलनस्थळी भेट देत आरक्षण मागणीस पाठिंबा दिला होता. त्यानंतर, आता आमदार सोपल यांनीही पत्र लिहीत आपली भूमिका स्पष्ट केली. “मराठा समाज गेल्या अनेक वर्षापासुन सामाजिक न्याय व समान संधीसाठी आरक्षणाची आग्रही न्याय मागणी करीत आहे या मागण्यांच्या समर्थनार्थ संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचे आझाद मैदान, मुंबई येथील न्याय आंदोलन सुरु आहे. मराठा समाजाच्या न्याय मागण्यास आमदार म्हणुन मी पुर्ण पाठींब दर्शवीत आहे. राज्यातील मराठा समाजातील लाखो सामाज बांधव या मागणीशी निगडीत असुन त्यांच्या सामाजिक, शैक्षणीक भविष्याचा प्रश्न समोर उभा आहे. शासनाने या प्रश्नावर न्याय निर्णय करावा हि माझी विनंती आहे. आपण कार्यवाही कराल अशी अपेक्षा”, असे सोपल यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. दरम्यान, ओबीसीमधून आरक्षणाची मागणी पत्रात नसल्याची टीकाही काही राजकीय कार्यकर्ते आणि मराठा आंदोलक करत आहेत.
मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर मागील तीन दिवसांपासून उपोषणाला बसलेले मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी आता आंदोलनाच्या लढ्यात आणखी एक आक्रमक पाऊल उचलले आहे. त्यांनी उद्यापासून पाणी पिणंही बंद करण्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली आहे.









