हातात तळपती तलवार घेऊन मंडळाच्या स्टेजवर धिंगाणा ; स्वतःला डॉन म्हणत केली दहशत, पोलिसांनी केली अटक

 स्वतःला डॉन म्हणत हातात तळपती तलवार घेऊन एका सराईत गुंडाने विक्रमनगर परिसरात एका मंडळाच्या स्टेजवर शनिवारी रात्री दहशत माजवली. यावेळी त्याने अश्लील शिवीगाळ केली. या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी त्या गुंडाला पोलिसी खाक्या दाखवत जेरबंद केले.

सचिन शिवाजी आगलावे (वय २६) असे अटक केलेल्या गुंडाचे नाव आहे. विक्रमनगरात स्वामी समर्थ मंदिराजवळ एका मंडळाने गणेशोत्सवासाठी स्टेज घातले होते. शनिवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास सराईत गुंड सचिन आगलावे हातात तळपती तलवार घेऊन तेथे आला. विशाल नावाच्या कार्यकर्त्याला मोठ्याने हाका मारून शिव्या देऊ लागला. अश्लील शिवीगाळ करत तलवार घेऊन तो स्टेजवर चढला. कार्यक्रम का बंद केला, मी तुम्हाला कधी त्रास दिला आहे का? असे मोठ्याने ओरडू लागला.

या गुंडाची दहशत पाहून तेथील नागरिक भयभीत झाले. दरम्यान, नागरिकांनी पोलिसांना फोन करून याची माहिती दिली. राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पथक त्या ठिकाणी गेले. संशयित सचिन आगलावे याला अटक केली. त्याच्याकडून २७ इंचाची तलवार जप्त केली आहे. विक्रमनगरात वर्चस्व निर्माण करण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून तो दहशत माजवत असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. संशयित सचिन आगलावे याच्यावर राजारामपुरी, शाहूपुरी, गांधीनगर अशा तीन पोलीस ठाण्यात मारहाण, दहशत माजवणे, शिवीगाळ यासह खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यात तो जामिनावर बाहेर आहे.