लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात झाली आहे. त्यानंतरही महायुतीत जागा वाटपाचा तिढा सुटताना दिसत नाही. मराठवाड्यातील धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाने उमेदवार जाहीर केले आहे. मात्र महायुतीमध्ये हे मतदारसंघ कोणाला सुटणार याचाच तिढा सुटताना दिसत नाही. आज (रविवार) या दोन्ही जागांसाठी मुंबईत वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत.
शिवसेना ठाकरे गटाने धाराशिवमध्ये विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावरच पुन्हा डाव लावला आहे. खैरे आणि अंबादास दानवे यांच्यात दिलजमाई झाल्याचेही आता समोर आले आहे. मात्र महायुतीत या दोन जागा नेमक्या कोणत्या पक्षाला सोडायच्या हेच ठरत नाही.
धाराशिवच्या जागे संबंधी चर्चा करण्यासाठी आज तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. तर दुसरीकडे सुरेश बिराजदार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देवगिरी बंगल्यावर भेट घेतली. 2019 मध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना येथे झाला होता. ओमराजे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे राणा जगजीतसिंह पाटील आमने-सामने होते. आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर खासदार ओमराजे ठाकरेंसोबत राहिले.
ही जागा महायुतीत शिंदेच्या गटाकडे येत असली तरी ओमराजेंच्या विरोधातील राणा जगजीतसिंह आता भाजपमध्ये आहेत. त्यामुळे भाजपची ताकद येथे वाढली असून त्यांची देखील या जागेची मागणी आहे. धाराशिवची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढत आली असल्यामुळे अजित पवार गटातील कार्यकर्तेही या जागेसाठी आग्रही आहेत. त्यासाठीच सुरेश बिराजदार यांनी अजित पवारांची भेट घेतली असण्याची शक्यता आहे. राणा जगजितसिंह हे अजित पवारांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे अजित पवार नातेवाईकासाठी जागा भाजपला सोडणार की पक्षासाठी कार्यकर्त्यांसाठी भाजपसोबत लढणार हे वे लागणार आहे.