धनंजय मुंडे खातेवाटपाआधीच राजीनामा देणार?

बीड – बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून वातावरण तापले आहे. यामध्ये परळी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वाल्मीक कराड याचाही कथित सहभाग असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच धनंजय मुंडे यांचेही नाव या प्रकरणात येत आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांना खातेवाटपाआधीच नारळ भेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरण सध्या विधानसभेतही गाजत आहे. सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर यांनी याविषयी आक्रमक भूमिका घेतली आहे. कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असल्यामुळे धनंजय मुंडे देखील विरोधकांच्या निशान्यावर आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी एका आयजी दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्यात येणार आहे, अशी घोषणा केली आहे. विशेष म्हणजे मुंडे हे मागील तीन दिवसापासून सभागृहात दिसलेले नाहीत. दरम्यान या घटनेतील आरोपींवर एका राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्याची चर्चा आहे. याकडे लक्ष वेधून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंडे यांना मंत्रिमंडळातून वगळण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती आहे . त्यामुळे बीड हत्याकांड प्रकरण धनंजय मुंडेंना भोवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. धस यांनी तर धनंजय मुंडे यांनी माध्यमासमोर यावे असे आव्हान दिले आहे, एखादा मंत्रीच जर तोंड लपवत असेल तर भुषावह नाही असे ते म्हणाले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाबरोबरच मित्रपक्ष देखील विरोधात आल्यामुळे अजित पवार हे धनंजय मुंडे यांना नारळ देण्याची शक्यता आहे. तसेच खाते वाटप न होण्यामागे हे महत्वाचे कारण असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. मुंडे हे अजित पवार यांच्या अत्यंत जवळचे आहेत, पण भाजपाच्या दबावामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून वगळले जाण्याची शक्यता वाढली आहे.

केज तालुक्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून करण्यात आला. पवनचक्कीच्या वादातून हा खून करण्यात आल्याचे सांगण्यात येते आहे. अवादा एनर्जी कंपनीचे काम सुरू ठेवण्यासाठी हात-पाय तोडण्याची धमकी देत दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.