मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी धनंजय महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी निवडणूक विभागाकडून धनंजय महाडिकांना नोटीस पाठवण्यात आली आहे. धनंजय महाडिक यांच्या वक्तव्यामुळे आचारसंहितेचा भंग झाल्याची फिर्याद निवडणूक विभागाच्या भरारी पथकाकडून नोंदवण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील फुलेवाडी येथील पाचवा स्टॉप येथे कोल्हापूर दक्षिणचे भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आयोजित केली होती. या सभेत धनंजय महाडिक यांनी आपल्या भाषणात लाडकी बहीण योजनेबाबत वक्तव्य करून भारतीय न्यायसंहिता – २०२३ चे कलम १७९ अन्वये आदर्श आचारसंहितेचे उल्लघंन केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे याबाबतचा खुलासा तात्काळ सादर करण्यात यावा, अशी नोटीस निवडणूक निर्णय अधिकारी कोल्हापूर दक्षिण यांनी धनंजय महडिक यांना दिली आहे.
धनंजय महाडिक यांनी एका सभेत लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत म्हटलं होतं की, सरकारने आणलेल्या लाडक्या बहीण योजनेला महिलांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. मात्र, असे असतानाही काँग्रेस याला विरोध करत आहे. त्यामुळे या योजनेचा फायदा घेऊन ज्या महिला काँग्रेस रॅलीत सहभागी होतील त्यांचे फोटो काढा. मी त्यांची व्यवस्था करतो, असे धनंजय महाडिक यांनी म्हटलं होतं.भाषणात केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर धनंजय महाडिक यांनी दिलगिरी व्यक्त करत महिलांची माफी मागितली, तरीही धनंजय महाडिक यांना निवडणूक विभागाने नोटीस पाठवली आहे. लाडकी बहीण योजनेबाबत केलेल्या वक्तव्याचा खुलासा करा, असे आदेश निवडणूक विभागाने दिले आहेत.