
धाराशिव जिल्ह्यात साकत येथे पूरामुळे नागरिक अडकले, उपमुख्यमंत्र्यांकडून पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा

मुंबई – धाराशिव जिल्ह्यात परंडा तालुक्यातील साकत येथे मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. गावामध्ये पाणी शिरले आहे. पूर परिस्थितीमुळे साकत गावाचा संपर्क तुटला असून तिथे १२ नागरिक अडकले आहेत. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना दूरध्वनी करून साकत गावात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे निर्देश दिले आहेत.

साकत गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी एनडीआरएफचे पथक पाठवावे तसेच हेलिकॉप्टरचीही व्यवस्था करावी, अशा सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर राज्य शासन लक्ष ठेवून आहे. जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी सतर्क रहावे. पूरस्थितीमुळे धोक्यातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावे, बचाव व मदत करण्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकांना सज्ज ठेवावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. या संकटाच्या काळात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, नुकसान झालेल्या नागरिकांसोबत आहे. त्यांना आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी दिला. दरम्यान आतापर्यंत ७० जणांना लष्करी हेलिकॉप्टरने सुरक्षित स्थळी आणले गेले. अजूनही काही जणांना बाहेर काढण्याचे काम सुरू असल्याचे जिल्हाधिकारी कीर्तीकुमार पुजार यांनी सांगितले. या तालुकयातील वाकी बोकी या गावात १६ जण अडकले असल्याचे सांगण्यात येत आहे.
मराठवाड्यातील अनेक जिल्हात ढगसदृश्य पाऊस पडला आहे. अनेक ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे तर अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थित निर्माण झाली आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूम, परंडा तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.









