दिल्ली पोलिसांची सर्वात मोठी कारवाई ; २००० कोटींचे ड्रग्ज जप्त, ४ जणांना पोलिसांकडून अटक

 देशाच्‍या राजधानीत आज अमली पदार्थविरोधी मोठी कारवाई करण्‍यात आली आहे. या कारवाईत ५०० किलोहून कोकेन जप्त करण्यात आले आहे. या कोकेनची किंमत सुमारे २ हजार कोटींहून अधिक असल्याचे सांगितले जात आहे. ही कारवाई दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने केली आहे. दिल्ली पोलिसांची आजवरची ही सर्वात मोठी कारवाई आहे. याप्रकरणी पोलिसांनी ४ आरोपींना अटकही केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे अंमली पदार्थांच्या तस्करीचे आंतरराष्ट्रीय सिंडिकेट आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दक्षिण दिल्लीत छापा टाकत एका मोठ्या ड्रग कार्टेलचा पर्दाफाश केला. दरम्‍यान, दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने ३० सप्टेंबर रोजी केलेल्‍या कारवाईदरम्यान २२८ किलो गांजा जप्त केला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत अंदाजे १.१४ कोटी रुपये आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आंध्र प्रदेश आणि ओडिशा सीमेवरून गांजा आणून दिल्ली आणि एनसीआरमध्ये पुरवायचा. गुन्हे शाखेने ऑपरेशन कवच सुरू केले आहे, ज्याचा उद्देश दिल्ली एनसीआरमध्ये अंमली पदार्थांच्या पुरवठ्याविरोधात लढा देणे आहे.