
सरकारच्या पडताळणीत ९ लाख महिला अपात्र, हे आहेत निकष, या बहिणींना नाही भेटणार हप्ता

मुंबई – राज्यातील महायुती सरकारला पुन्हा एकदा सत्तेत बसण्यासाठी अत्यंत महत्वाची ठरलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. याच योजने संदर्भात महत्वाची माहिती समोर आली आहे. आजपासून फेब्रुवारी महिन्याचा हप्ता भेटण्यास सुरूवात झाली आहे.

फेब्रुवारीचा हप्ता आजपासून देण्यास सुरुवात होणार आहे. यासाठी वित्त विभागाकडून ३४९० कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. लाडक्या बहिणींचा फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होणार? असा सवाल उपस्थित केला जात होता. पण आता आजपासूनच लाडकी बहिण योजनेचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. डिसेंबर अखेर २ कोटी ४६ लाख महिला लाभार्थी होत्या. त्यातील ५ लाख महिला अपात्र झाल्यानंतर जानेवारीअखेर २ कोटी ४१लाख लाभार्थी महिला होत्या. मात्र, अद्याप फेब्रुवारी अखेरची आकडेवारी आलेली नाही. मात्र, त्यातही अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे. अंदाजे ९ लाख महिला अपात्र होण्याची शक्यता आहे. दरम्यान ९ लाख महिला कमी झाल्यास राज्य सरकारच्या ९४५ कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती आहे. यापुढे ‘लाडकी बहिण’ योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकार नवीन निकष लागू करणार आहे. लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेकडे ‘ई-केवायसी’ आणि जीवन प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक असेल. सरकारच्या नव्या निर्णयामुळे, या योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळेल, असे सांगण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील विवाहित, घटस्फोटित, विधवा, सोडून दिलेल्या किंवा निराधार महिलांना तसेच ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न वार्षिक २.५ लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा महिलांना दरमहा दीड हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
राज्य सरकारकडून विधानसभा निवडणुकीच्या आधी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही महत्त्वाकांक्षी योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेच्या अंतर्गत महिलांना दर महिन्याला दीड हजाराचा लाभ दिला जातो. एप्रिलपासून हा लाभ दोन हजार शंभर रुपये होण्याची शक्यता आहे.









