लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीला एरर आणि ओटीपीचे ग्रहण

लाडकी बहीण योजने’च्या वेबसाईटवर अनेक अडचणी, बहिणींची काळजी वाढली, अन्यथा आर्थिक मदत बंद होणार?

मुंबई – महाराष्ट्र सरकारने ‘लाडकी बहीण योजने’साठी ‘ई-केवायसी’ सक्तीची केली आहे; पण त्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या संकेतस्थळात तांत्रिक त्रुटी उद्भवणे, ‘ओटीपी’ क्रमांक न येणे यांसह अनेक अडचणी लाभार्थी महिलांना येत आहेत. त्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त करत टीका केली आहे.

महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू झालेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. या योजनेत अनेक अपात्र महिला असल्याचे समोर आल्यानंतर सरकारने या योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी ई-केवायसी सक्तीचे केले असले, तरी ही प्रक्रिया महिलांसाठी मोठा त्रासदायक अनुभव ठरत आहे. दोन महिन्यांची मुदत देऊन शासन निर्णय जारी करण्यात आला असला, तरी लिंक ओपन न होणे, अधिकृत संकेतस्थळावर वारंवार एरर येणे, ओटीपी न मिळणे या तांत्रिक अडचणींनी बहिणींना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, इ केवायसी सुविधा https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेब पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रक्रिया सोपी आणि सोयीस्कर असून, फक्त आधार क्रमांकाद्वारे पडताळणी केली जाणार आहे, पण सध्या त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी e-KYC अनिवार्य केले आहे. लाभार्थ्यांनी १५०० चे मासिक सहाय्य सुरू ठेवण्यासाठी पुढील २ महिन्यांत अधिकृत पोर्टलवर ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे, अन्यथा लाभ थांबू शकतो.