ठेकेदारीच्या वादातून शेवाळेवाडीत दिवसाढवळ्या गोळीबार, गोळीबाराने शेवाळेवाडी परिसर हादरला

पुण्यात गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे.अशीच एक धक्कादायक घटना हडपसरमधील शेवाळेवाडी येथे घडली आहे. ठेकेदारीच्या वादातून शेवाळेवाडीत दिवसाढवळ्या गोळीबार झाला आहे. त्यामुळे शेवाळेवाडी परिसर हादरला आहे, सोसायटी सिक्युरिटी कामगार पळविण्याच्या वादातून एका माजी सैनिकाने दुसऱ्या माजी सैनिक ठेकेदारावर दिवसाढवळ्या गोळीबार केलाय. यामध्ये ठेकेदार गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. हे दोन्ही आरोपी एक माजी सैनिक असून दुसरा आरोपी त्याचा मुलगा आहे. सकाळी अचानक गोळीबार झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जयवंत खलाटे असे जखमी माजी सैनिकाचे नाव आहे. तर ऋषिकेश शेंडगे, सुधीर शेंडगे असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. घटना घडल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे व गुन्हे टीमने भेट देऊन तपासाची संपूर्ण माहिती घेतली.

हडपसर पोलीस स्टेशन गुन्हे पोलीस निरीक्षक मंगल मोढवे यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी व फिर्यादी दोघेही माजी सैनिक असून दोघांचा सिक्युरिटी ठेकेदारीचा व्यवसाय आहे.आज सकाळी साडेनऊच्या सुमारास शेवाळवाडी येथील संपन्न होम सोसायटी समोर दोन ठेकेदारांमध्ये सिक्युरिटी कामगारांवरून वाद झाला. दोन सिक्युरिटी ठेकेदारांमध्ये या अगोदर दामोदर विहार येथे वाद झाला. त्यानंतर शेंडगे घरी जाऊन पिस्तूल घेऊन आला आणि शेवाळेवाडीतील संपन्न होम्स सोसायटी समोर दोन गोळ्या झाडल्या, यामध्ये एक गोळी जयवंत खलाटे यांच्या पायाला लागली तर एक जमिनीवर लागली, यामध्ये खलाटे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी आर्मी रुग्णालयात दाखल केले आहे. या गोळीबार घटनेमुळे शेवाळेवाडी परिसरामध्ये नागिरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे व गुन्हे टीम करत आहे