सास-याच्या बचावासाठी मंत्री असलेली सून मैदानात?

खान्देशातील दोन नेत्यातील राजकीय वाद संपणार?, सास-यांच्या वादाचा सूनबाईला त्रास? म्हणाल्या….

जळगाव- भाजपचे मंत्री गिरीश महाजन व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. कधीकाळी हे दोघेही एकाच पक्षात म्हणजे भाजपात एकत्र होते. पण २०१४ नंतर मात्र त्यांच्यात वितुष्ट आले आहे. पण आता दोघात मनोमिलन होण्याची शक्यता आहे.

खडसे आणि महाजन वाद मागील दहा वर्षापासून चालत आलेला आहे. अगोदर जळगाव आणि खान्देशात खडसे यांचा एकछत्री अंमल होता. पण २०१४ नंतर फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी महाजन यांना ताकत देण्यास सुरुवात केली. तर दुसरीकडे खडसे वेगवेगळ्या कारणांनी अडचणीत येत गेले. आज महाजन यांचे खान्देशात वजन असून खडसे यांचे राजकीय वजन संपुष्टात येण्याची शक्यता आहे. खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे या मंत्री झाल्यानंतर त्यांची या दोघांच्या वादामुळे सतत अडचण होत आहे. दोघेही बडे नेते आहेत. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आरोप करताना टोकाचे शब्द वापरल्याने रक्षा खडसे यांच्यापुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये आपण समेट घडवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार असल्याचं मंत्री रक्षा खडसे यांनी म्हटले आहे. त्यानंतर महाजन यांनी रक्षा खडसे यांनी हे प्रयत्न त्यांनी घरातून सुरु करावेत असे सांगत एकनाथ खडसे यांना डिवचले होते. पण आता खडसे यांनी मात्र या मनोमिलनाचा प्रयत्न थांबवल्याचे संकेत दिले आहेत. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना हा विषय जुना झाला आहे… आता तुम्ही त्या दोघांनाच याबद्दल विचारा, असे सांगत हात वर केले आहेत. त्यामुळे गिरिश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात सध्या तरी मनोमिलन होणार नसल्याचे दिसत आहे.

एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात अगदी व्यक्तिगत पातळीवरचे आरोप – प्रत्यारोप होत आहेत. खडसे यांनी महाजन यांच्यावर मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. तर महाजन यांनी खडसेंच्या मार्को टेस्टची मागणी केली आहे.