
तीन खंडात होणार कुंभमेळा, या दिवशी सुरुवात, जाणून घ्या स्नानाच्या तारखा

नाशिक – नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तारखा आज रविवारी १ जून रोजी जाहीर करण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी संभाव्य तारखांची घोषणा करण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली असून, यात देशभरातील १३ प्रमुख आखाड्यांचे साधू-महंत उपस्थित होते. याच बैठकीत नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या शाही स्नानाच्या संभाव्य तारखा स्पष्ट करण्यात आल्या आहेत. त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पर्वाला ३१ ऑक्टोबर २०२६ पासून रामकुंडावर ध्वजारोहणाने प्रारंभ होणार असून, हे महापर्व २४ जुलै २०२८ पर्यंत सुरू राहणार आहे. यावेळी एकूण ४२ ते ४५ पर्वस्नान होणार असून, विशेष म्हणजे यंदाचा कुंभमेळा त्रिखंडी स्वरूपाचा असणार आहे. संपूर्ण कालखंडात नाशिक आणि त्र्यंबकेश्वर हे श्रद्धेचे प्रमुख केंद्र ठरणार आहेत. प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, वाहतूक नियोजन, निवास व्यवस्था आणि आरोग्य सुविधा यावर विशेष भर दिला जात आहे. या ऐतिहासिक आणि अध्यात्मिक पर्वासाठी राज्य सरकार, आखाडा परिषदा, स्थानिक प्रशासन आणि धर्माचार्य एकत्र येऊन नियोजन करत आहेत. भाविकांनी नियोजित तारखा लक्षात ठेवून आपली यात्रा आखावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रारंभ : ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी रामकुंड येथे ध्वजारोहण
समारोप : २४ जुलै २०२८ रोजी अंतिम पर्वस्नान.
२ ऑगस्ट २०२७ – सोमवती अमावस्या : पहिले शाही स्नान
३१ ऑगस्ट २०२७ – श्रावण वद्य अमावस्या : महाकुंभ स्नान
११ सप्टेंबर २०२७ – भाद्रपद शुद्ध एकादशी : अमृत शाही स्नान
२४ जुलै २०२७ – आषाढ कृष्ण पंचमी : आखाड्यांचं ध्वजारोहण
२९ जुलै २०२७ – एकादशी : नगर प्रदक्षिणा
३१ ऑक्टोबर २०२६ – सिंह राशी प्रवेश
२४ जानेवारी २०२७ – वक्री होऊन कर्क राशीत
२५ जून २०२७ – पुन्हा सिंह राशीत
२६ नोव्हेंबर २०२७ – कन्या राशीत
२८ फेब्रुवारी २०२८ – पुन्हा सिंह राशीत
२४ जुलै २०२८ – शेवटी कन्या राशीत प्रवेश









