आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या तारखा जाहीर

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची पालखी ‘या’ तारखेला करणार प्रस्थान, या तारखेला पंढरपूरात सोहळा

पुणे – महाराष्ट्राची अध्यात्मिक परंपरा असणाऱ्या आषाढी यात्रेची तयारी आता सुरू झाली आहे. आषाढी यात्रेसाठी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या प्रस्थानाच्या तारखा ठरल्या आहेत. त्यामुळे वारकरी देखील आता तयारीला लागले आहेत.

आषाढी यात्रेसाठी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान १९ जून रोजी आळंदीतून तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान १८ जून रोजी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख मानकरी राणा महाराज वासकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. सविस्तर पालखी सोहळा पत्रिका लवकरच जाहीर केली जाईल, अशी माहितीही देण्यात आली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान १९ जून रोजी होणार आहे. तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान १८ जून रोजी पंढरपूरच्या दिशेनं होईल. आषाढी वारीत पालख्यांची १७ मुक्कामानंतर पंढरपूरला पालखी सोहळा पोहोचेल.पंढरपूरमध्ये ६ जुलै रोजी आषाढीचा सोहळा पार पडणार आहे. आषाढी वारीची तयारी चैत्र वारीपासून करण्यात येते. यात प्रस्थान आणि मुक्कामांच्या तारखा ठरतात. याबाबत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वासकर फडाचे प्रमुख राणा महाराज वासकर यांनी माहिती दिली आहे.

आषाढी वारी हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा आहे, दरवर्षी लाखो भाविक संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून विविध संतांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन पंढरपूरला पोहोचतात. यावेळी भक्तीरसाची अनुभूती मिळते.