१०० रुपयांसाठी मेहुण्यानेच केला दाजीचा दगडाने ठेचून निर्घृण खून, तळेगाव दाभाडेतील घटना

पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे एमआयडीसीत एक भयंकर घटना समोर आली आहे. दारूच्या अंमलाखाली एका व्यक्तीने आपल्या बहिणीच्या नवऱ्याच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून केला आहे. अभिनंदन सारा असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी प्रमोद कुमार याच्यावर तळेगाव दाभाडे एमआयडीसी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत व आरोपी हे दोघेही एकमेकांचे नातेवाईक आहेत. मृत अभिनंदन सारा हा आरोपी प्रमोद कुमार यांच्या बहिणीचा पती होता. ते बिहार राज्यातील मधेपुरा जिल्ह्यातील खपिती या एकाच गावचे रहिवासी आहेत. कामाच्या निमित्ताने ते बिहार येथून दोन महिन्यापूर्वी दोघे एकत्रित तळेगाव दाभाडे एमआयडीसी येथे राहण्यास आले होते. एमआयडीसीत सोम कन्स्ट्रक्शन माध्यमातून ठेकेदाराच्या माध्यमातून नानोली येथे एका आयआयटी बांधकाम साईटवर मजुरीचे काम करत होते. दरदिवशी ५०० रुपये रोजंदारीवर त्यांचे काम सुरु होते. रविवारी रात्री दोघांनी जेवण करुन दारुचे सेवन केले होते. त्यानंतर प्रमोद कुमार याने अभिनंदन याच्याकडे १०० रुपये मागितले होते.

मात्र, त्याने पैसे देण्यास नकार दिला होता. याच रागातून प्रमोदने दारुच्या नशेत दगड उचलून तो अभिनंदन याच्या डोक्यात मारुन त्याला रक्तबंबाळ केले. या घटनेत त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांना घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. तसेच आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. याबाबत पुढील तपास पोलीस करत आहेत.