स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात राडा ! महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या गाडीवर ध्वजारोहणाच्या वेळी हल्ला

(प्रतिनिधी – प्रियंका बनसोडे) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्वातंत्र्य दिन समारंभात एका दिव्यांग बांधवाने महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या शासकीय चारचाकी वाहनाच्या काचा फोडल्या आहेत. विनायक सोपान ओव्हाळ असे या दिव्यांग व्यक्तीचे नाव आहे. ओव्हाळ यांच्या मागण्यांकडे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सातत्याने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे त्या व्यक्तीने स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात आपला निषेध नोंदवला आहे.

स्वातंत्र्य दिनानिमित्त महापालिका मुख्यालयात आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. राष्ट्रगीत झाल्यानंतर महाराष्ट्र गीत सुरू होते. त्याचवेळी अजय गायकवाड यांनी काठीच्या सहाय्याने आयुक्त सिंह यांच्या मोटारीची काच फोडली. पोलिसांनी तत्काळ गायकवाड यांना ताब्यात घेतले. चालकाने तत्काळ मोटार हलविली. ध्वजारोहण सुरू असताना घडलेल्या या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला होता. आयुक्त सिंह हे पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दुसऱ्या मोटारीने रवाना झाले. ‘अ’ क्षेत्रिय अधिकारी सुचेता पानसरे यांना महापालिकेत बोलवून घेण्यात आले आहे.

दरम्यान, महापालिकेच्या सुरक्षारक्षकांनी या दिव्यांग व्यक्तीला ताब्यात घेतलं होतं. त्याला एका खोलीत काही काळ डांबून ठेवलं होत.विनायक ओव्हाळ, या दिव्यांग बांधवाने आरोप केला आहे की, त्यांना पिंपरी चिंचवड महापालिकेने रमाई आवास योजनेच्या लाभासाठी डावललं आहे. तसेच शहरात अतिक्रमण कारवाई दरम्यान दिव्यांग बांधवांच्या टप-यांवर महापालिकेने कारवाई केली. याचा निषेध नोंदवण्यासाठी सोपान ओव्हाळ याने स्वातंत्र्यता दिनाच्या कार्यक्रमात महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या शासकीय चार चाकी वाहन फोडण्याचा दावा केला आहे.