उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मंझनपूर ब्लॉकच्या नेवारी उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक शैलेंद्र तिवारी यांनी विद्यार्थ्यासोबत क्रूर वर्तन केलं. शिक्षकाने मुलाला काठी फेकून मारली आणि त्यामुळे मुलाच्या डाव्या डोळ्याची दृष्टी गेली. दोन शस्त्रक्रिया करूनही विद्यार्थ्याची दृष्टी परत आली नाही.
शिक्षकाने प्रकरण निकाली काढण्यासाठी मुलाच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांचा बनावट चेक दिला होता. डीएम मधुसूदन हुलगी यांच्या सूचनेवरून पोलिसांनी आरोपी शिक्षक शैलेंद्र तिवारीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. हे प्रकरण करारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेवारीचे आहे. मुलाच्या आईने सांगितलं की तिचा मुलगा आदित्य कुशवाहा उच्च प्राथमिक शाळेत सहावीत शिकतो. शाळेत शिकण्यासाठी गेला असता, काही गोष्टीचा राग आल्याने शिक्षकाने विद्यार्थ्याला काठी फेकून मारली. ही काठी विद्यार्थ्याच्या डाव्या डोळ्याला लागल्याने त्याच्या डोळ्यातून रक्तस्त्राव सुरू झाला. या घटनेची तक्रार पोलिसांकडेही केल्याचं मुलाच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. पण त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं.
डॉक्टरांनी मुलावर दोनदा शस्त्रक्रियाही केल्या. परंतु त्याचा फायदा झाला नाही. शिक्षकाने १० लाखांचा बनावट चेक दिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या संदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांकडून चौकशी अहवाल मागवण्यात आला आहे. आरोपी शिक्षकावर पुढील विभागीय कारवाई करण्यात येईल असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. विद्यार्थ्याच्या आईने आता न्याय मागितला आहे.