
पोर्शे कार अपघातानंतर शहरात विनापरवाना आणि वेळेचे उल्लंघन करणाऱ्या पब, बार, रुफटॉप हॉटेलवर पुणे पोलीस, राज्य उत्पादन शुल्क आणि पुणे महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे . मात्र, बार चालकांवर याच काहीच परिणाम झाल्याचे दिसत नाही. येरवड्यातील क्रिएटीसिटी मॉलमध्ये असलेल्या किंग्स फूड अँड ब्रेवरी, हेलियम बार अँड रेस्टॉरंट या कंपन्यांच्यावतीने चालवल्या जाणाऱ्या ‘हॉटेल प्लिंक’ वर गुन्हे शाखेचा छापा टाकला आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने ही कारवाई शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास केली आहे. याठिकाणी बेकायदा विदेशी दारु आणि बियर विकली जात असल्याचे समजल्यानंतर कारवाई करुन हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

कृष्णा रामचंद्र नेवपाने , मॅनेजर गौरव मंगेश वाघोलीकर यांना ताब्यात घेण्यात आले असून पुणे शाखेने त्यांना येरवडा पोलिसांकडे सुपूर्द केले आहे. तर, जनरल मॅनेजर दीपक देविदास मंडवले आणि मालक विवेक दिलीप चड्डा यांच्यावर देखील भारतीय दंडविधान कलम १८८ ,३४ व महाराष्ट्र प्रोहीबिशन कायदा कलम ६५ इ प्रमाणे येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस शिपाई अविनाश कोंडे यांनी फिर्याद दिली आहे.

मुख्यमंत्र्यांनी अमली पदार्थाशी संबंधीत अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर पुणे महापालिकेने अनधिकृत बांधकाम करणाऱ्या हॉटेलवर बुलडोझर चालवत अवैध बांधकामे जमिनदोस्त केली आहेत. तर दुसरीकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तब्बल ७० बार बंद केले आहेत.गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला ‘हॉटेल प्लिंक’ येथे बेकायदेशीर दारु विकली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने मिळालेल्या माहितीची पडताळणी करुन याठिकाणी छापा टकला. हॉटेलमध्ये विदेशी दारु आणि बिअर विनापरवाना तसेच बेकायदेशीर विकण्यात येत असल्याचे आढळून आले. त्यानुसार संबंधितांवर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन दोघांना ताब्यात घेतले.
यासंदर्भात येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी सांगितले की, या हॉटेलचा चालक चोरून दारू विकत होता. यापूर्वी हे हॉटेल सील करण्याबाबत अहवाल पाठविण्यात आला होता. ६ जून रोजी येरवडा पोलीस स्टेशन व राज्य उत्पादन शुल्क विभागाने प्लिंक हॉटेलवर चोरून दारु विकताना मिळाल्याबाबत एकत्रितपणे छापा टाकला होता. हे हॉटेल सील करण्याबाबत पुन्हा स्मरणपत्र पाठवीत आहोत असे शेळके यांनी सांगितले.









