इन्स्टाग्रामवरून चौघांशी संपर्क ; महाविद्यालयीन तरुणीवर चौघांकडून बलात्कार, २ अल्पवयीन मुलांचा समावेश

लहान मुली, शालेय, महाविद्यालयीन तरुणींवर वाढत्या लैंगिक अत्याचारांच्या घटनांमुळे पोलिसांकडून शाळा, महाविद्यालयातून ‘गुड टच, बॅड टच’ कार्यक्रम घेतले जातात. अशाच एका कार्यक्रमातून तरुणीवर चौघांनी लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. कोरेगाव पार्क पोलिसांनी याप्रकरणी पोक्सो अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून दोघा जणांना अटक केली तर, दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
ओम आदेश घोलप (वय २०) आणि स्वप्निल विकास देवकर (वय २२) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सांगितले की, कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अधिकारी एका महाविद्यालयात ‘गुड टच, बॅड टच’ संदर्भातील कार्यक्रमाला गेल्या होत्या. त्यावेळी एक तरुणीने तणावाखाली होती. ती कॉन्सिलरकडे गेली. त्यावेळी बोलताना या तरुणीने माझी एक मैत्रिण कायम तणावाखाली असून तिच्याबाबत काही गैर प्रकार झाल्याचा संशय आहे, असे सांगितले.
त्यानंतर या कॉन्सिलरने महाविद्यालयांच्या ट्रस्टींना याबाबत माहिती दिली. त्यांनी कोरेगाव पार्क पोलिसांशी २४ सप्टेबर रोजी रात्री संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर संबंधित तरुणीला आई वडिलांसह बोलविण्यात आले. तिचा इन्स्टाग्रामवरून चौघांशी संपर्क झाला होता. त्यांच्याशी वेगवेगळ्या वेळी शारीरीक संबंध आल्याचे तिने सांगितले. ही तरुणी अल्पवयीन असल्याने पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.त्यातील एक आरोपी हा महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. इतर अन्य महाविद्यालयातील आहेत. दोघे जण अल्पवयीन असून दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांचा एकमेकांशी संपर्क असल्याचे अजून तरी समोर आले नाही. हा प्रकार एप्रिल ते सप्टेबर दरम्यान झाला असून कोणत्याही पार्टीमध्ये झाला नसल्याचे पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सांगितले.