
धनकवडीतील पाटीलनगरमध्ये दोन टोळ्यांनी राडा घालत ‘‘आपणच इथले भाई आहोत, जो समोर येईल, त्याला सोडायचे नाही’’ असे म्हणत एकावर कोयत्याने वार केला. आजीच्या हातावर उलटया कोयत्याने मारुन दहशत पसरविली.

याबाबत रोहित राजेंद्र रोंगे (वय २५) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी संकेत कसबे (वय २३), सोहम सोनार (वय २०), शंशांक मेमाणे, पियुष भरम (वय २३), युवराज धुळे (वय १८) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हा प्रकार पाटीलनगरमध्ये शनिवारी रात्री आठ वाजता घडला होता.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या घराचे पार्किंगमध्ये असताना आरोपी हत्यारासह तेथे आले. त्यांनी फिर्यादीच्या डोक्यात व दोन्ही हातावर कोयत्याने वार करुन त्यांना गंभीर जखमी केले. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली.

फिर्यादीच्या आजी पुढे आल्या, तेव्हा त्यांच्या हातावर उलट्या कोयत्याने मारुन तिला जखमी केले. हातातील कोयते हवेत फिरवून ‘‘आपण इथले भाई आहोत़ जो समोर येईल त्याला सोडायचे नाही,’’ असे मोठ मोठ्याने ओरडून परिसरात दहशत निर्माण केली.रोहित रोंगे याला उपचारासाठी ससून मध्ये दाखल करण्यात आले. रोहितवरील हल्ल्याची माहिती त्याच्या मित्रांना मिळताच ते दुचाकीवरुन ही टोळी रहात असलेल्या गणेश चौकातील शेलार चाळ येथे गेले. त्यांनी रोहित ला मारहाण करणार्यांचा शोध घेतला. पण ते मिळून न आल्याने तेथे असलेल्या रिक्षाच्या काचा फोडल्या. राजेश कुंजीर यांची चार चाकी गाडीच्या मागील बाजूस कोयते मारुन नुकसान केले. तसेच दोन दुचाकींवर वार करुन नुकसान केले.









