
जिल्ह्यातील जलजीवन मिशनचा आढावा, बैठकीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

नागपूर – नागपूर जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत योजनांची प्रलंबित कामे १० ऑगस्ट २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश, महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज अधिकाऱ्यांना दिले. जल जीवन अंतर्गत १३०२ योजनांची सर्व कामे गुणवत्तापूर्णरित्या करावीत असेही त्यांनी सांगितले.

जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात सुरु असलेल्या विविध योजनांची माहिती बावनकुळे यांनी यावेळी जाणून घेतली. या मिशन अंतर्गत येणाऱ्या योजना व यातील अपूर्ण योजनांच्या खर्चाचा नव्याने आराखडा तयार करावा, निधी प्राप्त झाल्यावर पुन्हा खर्चाचा आराखडा तयार करुन निविदा काढाव्यात. एका कंत्राटदाराला दोन पेक्षा जास्त कामे देण्यात येऊ नये आदी सूचना करुन ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्यांनी येत्या १५ दिवसात प्रलंबित सर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील एकुण १३ तालुक्यात समाविष्ट १३०२ योजना व यातील योजनांची पूर्ण झालेली कामे, प्रगतीपथावर असलेल्या योजना तसेच ग्रामपंचायतींकडे हंस्तातरित करण्यात आलेल्या योजना, प्रलंबित असलेली नळ जोडणीची कामे आणि केंद्र व राज्य शासनाकडून जलजीवन मिशन अंतर्गत करावयाच्या कामांसाठी आवश्यक निधी आदींबाबत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक धोंगे यांनी सादरीकरण केले. जिल्ह्यातील पाणी टंचाई कृती आराखडयातील आतापर्यंत हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती बावनकुळे यांनी यावेळी जाणून घेतली. ज्या गावांमध्ये पाण्यांचे स्त्रोत कोरडे झाले आहेत तिथे बंधारा बांधून पाणी अडवणे, जल पुनर्भरणाची कामे हाती घेणे व अशा गावांमध्ये १५ लाखांच्या मर्यादेतील कामे तातडीने करण्याचे निर्देशही बावनकुळे यांनी यावेळी दिले. महावितरण कंपनीकडून पाणी पुरवठा योजनांसाठी आवश्यक वीज जोडणीच्या प्रलंबित प्रकरणांचा आढावाही यावेळी घेण्यात आला.
महावितरणकडून शहरी आणि ग्रामीण भागात उभारावयाची अतिरिक्त रोहित्रे, वीज वितरणाबाबत करावयाचे व्यवस्थापन आदींविषयी बावनकुळे यांनी यावेळी यंत्रणांना सूचना केल्या. तसेच गावोगावांमध्ये जाऊन जनतेशी संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी नियोजन करुन त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले.









