(प्रतिनिधी – प्रियंका बनसोडे)- लोणी गावातून शाळेत चाललेल्या आठवीच्या विद्यार्थिनीला शाळेत सोडतो, असे म्हणून रिक्षाचालकाने बळजबरीने रिक्षात बसवले. त्यानंतर शाळेत सोडण्याऐवजी स्वतःच्या घरी नेऊन लैगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना लोणी काळभोर परिसरात मंगळवार (दि.६) सकाळी १० ते दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात रिक्षा चालकावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय वसंत जाधव (वय-२४) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी ही लोणी काळभोर परिसरातील एका नामवंत शाळेत इयत्ता आठवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. ती दररोज शाळेला रिक्षा अथवा बसमधून जाते. दरम्यान, मुलगी मंगळवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास नेहमीप्रमाणे शाळेत चालली होती. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रिक्षाची वाट पाहत थांबली होती. तेव्हा तोंडओळखीचा रिक्षाचालक आरोपी विजय जाधव तेथे आला. व चल तुला शाळेला सोडवतो, असे म्हणाला. अल्पवयीन मुलगी रिक्षात बसल्यानंतर आरोपी पिडीतेला म्हणाला, तुझ्या आईचा फोन आला होता, तुझी आई मी राहत असलेल्या घरी येणार आहे. असे खोटे सांगून मुलीला घरी घेऊन गेला. त्यानंतर तिच्यासोबत लगट करून बळजबरी करू लागला. तसेच पिडीतेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल अशी वर्तवणूक करू लागला. मात्र आरोपीच्या तावडीतून सुटण्यासाठी मुलगी जोरजोरात ओरडू लागली. तेव्हा आरोपी तेथून पळून गेला.
याप्रकरणी पीडितेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी विजय जाधव याच्यावर विनयभंगासह बाललैंगिक अत्याचार कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दाखल होताच, आरोपी विजय जाधव हा फरार झाला आहे. पोलीस आरोपीच्या मागावर आहेत. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक उदय काळभोर यांनी भेट दिली आहे. याबाबतचा पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार करत आहेत.