संसद परिसरात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारात धक्काबुक्की

दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरुन वाद निर्माण झाला आहे. यावरुनच संसद भवन परिसरात विरोधक आंदोलन करत आहेत तर प्रत्यूत्तरात भाजपनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये हाणामारी झाली असून सत्ताधारी पक्षाचे दोन खासदार जखमी झाले आहेत.

अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, असा आरोप विरोधी पक्षांनी केला. त्याच पार्श्वभूमीवर आज संसदेत विविध पक्षांनी आंदोलन केले. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी धक्काबुक्की केल्याने मला दुखापत झाली असल्याचा आरोप भाजपचे खासदार प्रतापचंद्र सारंगी यांनी केला आहे. खासदार प्रतापचंद्र सारंगी म्हणाले की, मी संसद भवनाच्या पायऱ्यांजवळ उभा होतो. त्यावेळी राहुल गांधींनी खासदार मुकेश राजपूत यांना धक्का दिला. त्यामुळे राजपूत तोल जाऊन प्रताप सारंगी यांच्या अंगावर पडल्यामुळे आपण जखमी झाल्याचे सारंगी यांनी सांगितले. राहुल यांनी धक्का दिल्यामुळे मुकेश राजपूत कोसळल्याने वयोवृद्ध असलेले प्रताप सारंगी खाली कोसळले. या घटनेत प्रतापचंद्र सारंगी यांच्या डोक्याला मार लागला आहे. या घटनेनंतर मुकेश राजपूत यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ते आयसीयूमध्ये ठेवण्यात आलेय. तर खासदार प्रतापचंद्र सारंगी यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी या घटनेची कठोर निंदा केली आहे. संसद हे लोकशाहीचे मंदिर असून इथे गुंडागर्दीला स्थान नसल्याचे ते म्हणाले आहेत. दरम्यान, या प्रकरणी भाजप राहुल गांधींविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करणार आहे, असे सांगितले जात आहे. अमित शहा यांनी आंबेडकरांचा अपमान केला असून त्यांना पंतप्रधान मोदी यांनी मंत्रिमंडळातून हटवावे, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.

खासदार राहुल गांधी म्हणाले, “जेव्हा मी संसदेच्या प्रवेशद्वारावर जाण्याचा प्रयत्न करत होतो, तेव्हा भाजपचे खासदार मला रोखण्याचा प्रयत्न करत होते. ते मला धमक्या देत होते, त्यामुळे हे घडले. हे संसदेचे प्रवेशद्वार आहे आणि आम्हाला आत जाण्याचा अधिकार आहे. मुख्य मुद्दा हा आहे की ते संविधानावर हल्ला करत आहेत.”असे म्हणत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.