
माहितीचा अधिकार कायद्याच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त माहिती अधिकार कट्टा, अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन

पुणे – नागरिकांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मिळवण्याबरोबरच सार्वजनिक रित्या उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार उघडकीस आणावेत असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले. माहितीचा अधिकार कायद्याच्या (RTI Act) २० व्या वर्धापन दिनानिमित्त माहिती अधिकार कट्ट्यातर्फे एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनीया, माजी IAS अधिकारी महेश झगडे, आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक दत्तात्रय वारे गुरुजी यांनी मार्गदर्शन केले.

सार्वजनिक रित्या उपलब्ध असलेली माहिती कशी मिळवावी आणि त्याचं विश्लेषण कसं करावं याची माहिती अंजली दमानिया यांनी प्रात्यक्षिकांसह उपस्थितांना दिली. आपण बहुतेक वेळा सार्वजनिक रित्या उपलब्ध असलेल्या माहितीचा वापर करतो. त्यामुळे कोणीतरी आपल्याला माहिती देत असतं हा आरोप खोटा असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच RTI कायद्याचा उपयोग करून सार्वजनिक माहितीच्या माध्यमातून भ्रष्टाचार उघड करण्याची संधी सर्व नागरिकांकडे आहे. त्यांनी नागरिकांना आवाहन केले की सर्वांनी पुढे येऊन RTI कायद्याचा सक्रियपणे उपयोग करावा आणि आपल्या हक्कासाठी आवाज उठवावा. देशात आणि राज्यातही माहिती अधिकार कायद्याची हेळसांड होत असून माहिती अधिकार मागितलेली माहिती मिळत नाही नागरिकांना थातूरमातूर उत्तर मिळतात त्यामुळे हा कायदा संपल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तरीही काही लोक निर्धारपूर्वक माहिती मागत आहेत नी त्याचा पाठपुरावा करत आहेत त्यामुळे थोडीशी आशा जिवंत आहे, याच आशेला आणखी बळकट केले पाहिजे आणि जो अधिकार लयाला गेलेला आहे तो पुन्हा एकदा मिळवण्यासाठी या कायद्याला बळ दिले पाहिजे. हा कायदा पुन्हा आपल्या मूळ पदावर कसा येईल किंवा शक्तिमान कसा होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. म्हणूनच माहिती अधिकार कायद्याच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त पारदर्शकतेल बळ देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याचे माहिती अधिकार कट्ट्याचे संस्थापक विजय कुंभार यांनी सांगितले. दत्तात्रय वारे गुरुजींनी जिल्हा परिषदेच्या शाळेत बदल घडवून आणून, अडथळ्यांना तोंड देत, शिक्षण प्रणाली सुधारण्याच्या आपल्या निर्धाराने आंतरराष्ट्रीय ओळख मिळवली. तसेच कितीही अडथळे आले तरी आपले काम थांबवणार नाही असा निर्धारही व्यक्त केला. त्यांच्या प्रेरक कार्यामुळे सभागृहात उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांचा वर्षाव करून त्यांचे अभिनंदन केले. .
माजी IAS अधिकारी महेश झगडे म्हणाले की जागतिक पातळीवर लोकशाहीचा निर्देशांक (index of democracy) कमी होत आहे. जर आपण खरोखर बदल पाहू इच्छितो, तर प्रशासनिक प्रणालीमध्ये खोलवर सुधारणा करणे अत्यावश्यक आहे.









