
सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आवाहन, सरकारकडून आकडेवारी जाहीर

मुंबई – राज्यात सध्या काही रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून येत असून सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कोविड तपासणी व उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

कोविड हा आजार विषाणूमुळे होणारा आजार आहे. सद्यस्थितीत कोविडसाठी राज्यात आयएलआय (इन्फ्लूएंझा सारखा आजार) आणि एसएआरआय (गंभीर तीव्र श्वसन संसर्ग) सर्वेक्षण चालू आहे. त्या सर्वेक्षणामध्ये अशा रुग्णांची कोविडसाठी चाचणी केली जाते. रुग्ण कोविड पॉझीटीव्ह आढळल्यानंतर नियमित उपचार केले जात आहेत. राज्यात सध्या कोविड केसेस तुरळक आहेत. जानेवारी २०२५ पासून १२ हजार ११ रुग्णांची कोविड चाचणी केली असून त्यापैकी ८७३ पॉझीटीव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून आतापर्यंत ३६९ रुग्ण बरे झाले आहेत. कोविड रुग्णांची तुरळक वाढ फक्त महाराष्ट्रात नव्हे, तर इतर राज्यात तसेच काही इतर देशात देखील दिसून येत आहे. फ्लूसदृश्य आजार व एसएआरआय (तीव्र श्वसन दाह असलेले रुग्ण) यांचे आरोग्य विभागामार्फत नियमित सर्वेक्षण सुरू आहे. तसेच तीव्र श्वसनदाह असलेल्या सर्व रुग्णांचे कोविड-19 या आजारासाठी आरटीपीसीआर चाचणी करण्यात येते. तसेच फ्लू-सदृश आजार असलेल्या रुग्णांपैकी 5% रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत आहे. सर्व आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आलेले नमुने संपूर्ण जिनोम सिक्वेन्सिंगसाठी एन आय व्ही, पुणे व बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे व राज्यातील इतर प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येतात.
आरोग्य आरोग्य विभागाने जाहीर केलेली माहिती
02 जून 2025 रोजी पॉझीटीव्ह रुग्ण – 59 (मुंबई-20, ठाणे-4, पुणे-1, पुणे मनपा-17, पिंपरी चिंचवड मनपा – 2, सातारा – 2, कोल्हापूर मनपा – 2, सांगली मनपा – 1, छत्रपती संभाजीनगर – 1, छत्रपती संभाजीनगर मनपा – 7, अकोला मनपा – 2)
2 जून 2025 रोजी सक्रिय असलेले रुग्ण – 494
माहे जानेवारी 2025 पासून मुंबई मधील एकूण रुग्ण संख्या – 483 (जानेवारी – 1, फेब्रुवारी 1, मार्च- 0, एप्रिल- 4, मे – 477)









