‘चिप मिनिस्टर’ देवेंद्र फडणवीस निवडणूक आयोगाचे दलाल की वकील?

प्रश्न आयोगाला मग उत्तर भाजपा का देते? मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी न करता राहुल गांधींवर आगपाखड कशासाठी?

मुंबई – लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने भाजपाने मतचोरी कशी केली, हे पुराव्यासह मांडून देशात एकच खळबळ उडवून दिली. राहुल गांधींच्या धमाक्यानंतर आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले. या आंदोलनाआधी टिळक भवनमधील पत्रकार परिषदेत बोलताना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी निवडणूक आयोग व भाजपाचा खरपूस समाचार घेतला,

राहुल गांधी यांनी अत्यंत तर्कसंगत मांडणी करून मतदानातील मोठा घोटाळा उघड केला, लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम कसे सुरु आहे? हे दाखवून दिले. निवडणुकीतील हा घोटाळा स्पष्ट दिसत असल्याने सरकारने राजधर्म पाळत एखादी एसआयटी गठीत करायला हवी होती अथवा सर्वोच्च न्यायलयाच्या न्यायमूर्तींकडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली पाहिजे होती. पण राहुल गांधी यांनी पुरावे देत तथ्य मांडूनही ना केंद्र सरकारने चौकशी करण्याची धमक दाखवली ना निवडणूक आयोगाने काही खुलासा केला, उलट राहुल गांधी यांनाच प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले, हा आणखी हास्यास्पद प्रकार आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या १९६० च्या नियमावलीनुसार, जर अशा प्रकारे कोणी हरकत घेतली वा आक्षेप नोंदवला तर नियम १७/१८/१९ नुसार ताबडतोब चौकशी करावी, असे कायदाच सांगत आहे, मग चौकशी का केली जात नाही? असे सपकाळ म्हणाले. निवडणूक आयोगाची पोलखोल केल्यानंतर भाजपाची पिलावळ राहुल गांधी यांच्यावर अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन टीका करत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल जी भाषा वापरली त्यातून ते निवडणूक आयोगाचे दलाल आहेत, वकील आहेत की प्रवक्ते असा प्रश्न पडतो. फडणवीस यांच्यात अहंकार दडलेला आहे, या अहंकराचा दर्प नाही तर दुर्गंधी त्यांच्या बोलण्यातून दिसली. हे ‘चिफ मिनिस्टर’ नाही चर ‘चिप मिनिस्टर’ आहेत. जेव्हा जेव्हा निवडणूक आयोगावर बोलले जाते तेव्हा तेंव्हा भाजपा व देवेंद्र फडणवीस यांची तडफड का होते? केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व फडणवीस आयोगाचा बचाव करण्यास का येतात? कारण ‘दाल में कुछ काला है’ असे नाही तर सर्व दालच काळी आहे. राहुल गांधी यांनी जो घोटाळ दाखवला त्यातून निवडणूक आयोग बरोबरचे हितसंबंध उघडे पडतील याची भिती देवेंद्र फडणवीस यांना वाटत असावी म्हणूनच त्यांची फडफड होत असावी, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

काँग्रेसने मतदानावेळीच हरकत का घेतली नाही, या प्रश्नावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, भाजपाकडून असे प्रश्न उपस्थित करून भ्रम पसरवला जात आहे. मतदानावेळी व त्यांनतरही काँग्रेसने आक्षेप घेतलेले होते व हरकतीही उपस्थित केल्या आहेत. पराभूत उमेदवारांनी उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केलेल्या आहेत. निवडणूक आयोगाला भेटून घोटाळाचे पुरावेही त्याचवेळी दिले आहेत पण भाजपा केवळ बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करत आहे.