
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘लोकराज्य’चा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यावरील विशेषांक प्रकाशित

अहिल्यानगर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त चौंडी ता.जामखेड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकास भेट देऊन अभिवादन केले.

यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक आणि त्याच परिसरातील महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते महाआरतीही करण्यात आली. यावेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्ताने त्यांच्या जीवन कार्यावर आधारित ‘लोकराज्य’ च्या विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक आणि ‘लोकराज्य’चे मुख्य संपादक ब्रिजेश सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली या अंकाची निर्मिती करण्यात आली आहे. अंकाच्या मुखपृष्ठावर जन्म त्रिशताब्दी निमित्ताने तयार करण्यात आलेले बोधचिन्ह आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनकार्य, त्यांचे महाराष्ट्रातील कार्य, धर्मपरायणता, समाजकार्य, राज्यकारभाराचा आदर्श, दातृत्व, त्यांनी उभारलेल्या विविध वास्तूंची माहिती अंकात देण्यात आली आहे.
अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनाविषयी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्यासह विविध मान्यवरांनी लिहिलेले लेख अंकात समाविष्ट आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेसह शासनाने जन्म त्रिशताब्दी उत्सवानिमित्त घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांची माहिती देखील या अंकात देण्यात आली आहे.









