पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार भरीव मदत करणार

केंद्रीय मंत्री शाह यांच्या हस्ते पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा नूतनीकरण शुभारंभ

शिर्डी – अतिवृष्टी व पुरामुळे महाराष्ट्रातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून महाराष्ट्र शासनाकडून नुकसानीचा तपशीलवार अहवाल मिळताच केंद्र सरकार क्षणाचाही विलंब न करता शेतकऱ्यांसाठी भरीव मदत जाहीर करेल, अशी ग्वाही केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी दिली.

लोणी येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या नूतनीकरण शुभारंभप्रसंगी केंद्रीय मंत्री शाह बोलत होते. केंद्रीय मंत्री शाह म्हणाले, केंद्र सरकारने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ३ हजार १३२ कोटींची मदत मंजूर केली आहे. यापैकी एप्रिलमध्ये १ हजार ६३१ कोटी वाटप करण्यात आले असून, यात महाराष्ट्रासाठी २१५ कोटींचे विशेष मदत पॅकेज देण्यात आले आहे. कर्जवसुलीवर तात्पुरती स्थगिती व विद्यार्थ्यांसाठी परीक्षांमध्ये सवलती यांसारखे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व पद्मविभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी सहकार आंदोलन, ग्रामीण विकास व शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केलेले कार्य अभूतपूर्व आहे. त्यांच्या कार्याच्या पायावर आज महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र उभे आहे. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, धनंजयराव गाडगीळ व वैकुंठभाई मेहता यांनी सहकार चळवळीची पायाभरणी केली. विखे पाटील यांनी देशातील पहिला सहकारी साखर कारखाना सुरू करून शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा पाया रचला. व्यापाऱ्यांच्या घरात जाणारा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यात जाऊ लागला. डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये वित्त राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. त्यांनी आरबीआयमार्फत गुजरातमधील सहकारी बँकांना वाचविणारे महत्त्वपूर्ण ‘रिव्हायव्हल पॅकेज’ मिळवून दिले, असे केंद्रीय मंत्री शाह म्हणाले आहेत.

भारताला जगात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी या दिवाळीत आपण सर्वांनी एकत्र येऊन घरात कोणतीही परदेशी वस्तू आणणार नाही असा संकल्प करावा. देशातील १४० कोटी लोकांनी व व्यापाऱ्यांनी ‘मेक इन इंडिया’चा अंगीकार केला, तर २०४७ पूर्वी भारत जगातील पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल, असेही शाह यांनी नमूद केले.