
पुणे : खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या पाठपुराव्याला अपेक्षित यश आले असून जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर दौंड तालुक्यातील पाटस, वरवंड आणि खडकी या तीन ठिकाणी भुयारी मार्ग करण्यास केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. यासाठी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे विशेष आभार मानले आहेत.

संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग हा पुणे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्ग असून या रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांची प्रचंड मोठी वाहतूक असते. परिणामी या रस्त्यालगतच्या गावांतील नागरिकांना रस्ता ओलांडणे मोठे जिकिरीचे असते. याबाबत दौंड तालुक्यातील पाटस येथे संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग आणि पुणे सोलापूर महामार्ग जंक्शन, वरवंड येथे पालखी विसावा रोड आणि महामार्ग जंक्शन आणि खडकी येथे पारवडी-खडकी रोड आणि पुणे सोलापूर महामार्ग जंक्शन येथे भुयारी मार्ग करावा अशी स्थानिक नागरिकांनीही अनेक वेळा मागणी केली होती.

नागरिकांची ही गरज लक्षात घेता खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्रालयाकडे याबाबत मागणी केली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही प्रत्यक्ष भेट घेण्याबरोबरच लेखी पत्रव्यवहारही केला होता. या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर अपेक्षित यश आले असून केंद्र सरकारने या तीन ठिकाणी भुयारी मार्ग करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच याठिकाणी भुयारी मार्गाचे काम पूर्ण होऊन नागरिकांना महामार्ग ओलांडणे सोपे जाणार आहे. या मंजुरीसाठी सुळे यांनी गडकरी यांचे आभार मानले आहेत.









