कर्णधार रोहित शर्मा ‘या’ दिवशी होणार निवृत्त

मुंबई – मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा १८४ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला आहे. त्यामुळे कसोटी चॅम्पियन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचण्याच्या भारताच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. या पराभवानंतर रोहित शर्माच्या कर्णधारपदावर आणि फलंदाजीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे रोहित शर्मा मोठा निर्णय घेत कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहिर करण्याची शक्यता आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत मालिकेत २-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या खेळावर आणि नेतृत्वावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. अशातच आता रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. सिडनी कसोटीनंतर रोहित कसोटी क्रिकेटला रामराम ठोकण्याची शक्यता आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार रोहित सिडनी कसोटीनंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती समोर आली आहे. बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी आणि निवडकर्त्यांमध्ये रोहितच्या निवृत्तीबद्दल चर्चा होत आहे अशी माहिती समोर आली आहे. भारतीय क्रिकेट संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये पोहोचण्यात यशस्वी झाला तर रोहित अंतिम सामना खेळू शकतो असेही बोलले जात आहे. मात्र फायनलमध्ये पोहोचण्याची भारताची शक्यता कमी आहे. सध्या रोहित खराब फार्मात आहे. त्याने पाच डावात ६.२ च्या सरासरीने केवळ ३१ धावा केल्या आहेत. रोहित शर्माने ६७ कसोटी सामन्याच्या ११६ इनिंगमध्ये ४३०२ रन्स केले आहेत. ४०.५८ च्या सरासरीने रोहितने चमकदार कामगिरी केली आहे. तसेच रोहितच्या नावावर १२ शतक, एक द्विशतक तर १८ अर्धशतक आहेत.

मेलबर्नमधील पराभवानंतर रोहित शर्माच्या नावावर एक लाजिरवाणा आणि नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. खरे तर यावर्षी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला सहाव्यांदा कसोटी फॉर्मेटमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. अशाप्रकारे रोहित शर्मा एका वर्षात सर्वाधिक कसोटी हरणारा भारतीय कर्णधार बनला आहे. यापूर्वी हा नकोसा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता, मात्र आता रोहित शर्माने मास्टर ब्लास्टरला मागे टाकले आहे.