
राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडपम येथे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ ग्रहण सोहळा संपन्न, माजी उपराष्ट्रपती धनकड उपस्थित

नवी दिल्ली – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांना आज राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडपम येथे पदाची शपथ दिली. उपराष्ट्रपतीपदाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राधाकृष्णन यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन यांचा पराभव करून विजय मिळवला होता. राधाकृष्णन याआधी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते.

या सोहळ्याला सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, अनेक केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र विधानसभाचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, महाराष्ट्र विधानपरिषदचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राजकीय नेते, उच्चपदस्थ अधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. उपराष्ट्रपती म्हणून सी. पी. राधाकृष्णन हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. उपराष्ट्रपती म्हणून त्यांची निवड झाल्यामुळे त्यांनी आपल्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार आता गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जारी केले आहे. सी. पी. राधाकृष्णन यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला होता. सी. पी. राधाकृष्णन यांना ४५२ मते मिळाली होती तर, इंडिया आघाडीच्या बी. सुदर्शन रेड्डी यांचा ३०० मते मिळाली होती. सी. पी. राधाकृष्णन यांच्या शपथ कार्यक्रमासाठी एनडीएच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी या शपथविधी सोहळ्यावेळी उपस्थित नव्हते. ते सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत.
राधाकृष्णन कोइम्बतूरचे दोन वेळा खासदार राहिले आहेत. त्यांनी जनसंघातून राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली होती. त्यांनी भाजपचे तामिळनाडूतील प्रमुख म्हणून काम केले. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेले आहेत. फेब्रुवारी २०२३ मध्ये त्यांची झारखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली आणि जुलै २०२४ मध्ये ते महाराष्ट्राचे राज्यपाल झाले.









