क्यु आर कोड बदलून मॅनेजरनेच घातला मालकाला ३ लाख रुपयांना गंडा! कोंढव्यातील घटना

कोंढव्यातील अलिचीज रेस्टॉरंटमधील मॅनेजरने मालकाने लावलेले क्यु आर कोड काढून त्याजागी आपल्या बँक खात्याचे क्यु आर कोड लावून तब्बल ३ लाख रुपयांना गंडा घातला. मोनु सॅम्युअल असे गुन्हा दाखल झालेल्या मॅनेजरचे नाव आहे.

याबाबत अहमद मोहम्मदअली अलीची यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना उंड्रीमधील अलिचीज रेस्टॉरंटमध्ये डिसेंबर २०२३ ते जून २०२४ दरम्यान घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमद यांचे उंड्रीत अलिचीज रेस्टॉरंट आहे. ते दुबईला गेले होते. त्या काळात त्यांचा भाऊ रेस्टॉरंटचा कारभार पहात होता. त्याचे डोळ्याचे ऑपरेशन झाल्याने काही काळ ते नियमित रेस्टॉरंटमध्ये येऊ शकत नव्हते. मोनु सॅम्युअल हा मॅनेजर म्हणून काम पहात होता. रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना पैसे देण्यासाठी अहमद यांच्या बँकेचे क्युआर कोड लावले होते.

त्यातील काही क्युआर कोड मोनु याने बदलून त्या जागी आपल्या विविध बँक खात्याचे क्यु आर कोड लावले. रेस्टॉरंटमध्ये आलेल्या काही ग्राहकांना तो आपल्या क्यु आर कोडवरुन पेमेंट करायला सांगत असे. ऑनलाईन पेमेंट केले की ते अहमद यांच्या खात्यात जाण्याऐवजी मोनुच्या खात्यात जात होते. रेस्टॉरंटचा धंदा चालत नसल्याचे सांगून मोनु त्यांच्याकडे उलट पैसे मागू लागला होता. तेव्हा त्यांनी सीसीटीव्ही चेक केले. त्यात रेस्टॉरंटमध्ये तर ग्राहकांची संख्या चांगली दिसत असताना प्रत्यक्षात गल्ला कमी कसा, असा प्रश्न पडला. तेव्हा त्यांनी नेहमीच्या काही ग्राहकांना विचारल्यावर त्यांनी पूर्वी ऑनलाईन पेमेंट केल्यावर रेस्टारंटचे नाव यायचे आता मोनुचे नाव येते असे सांगितले. त्यानंतर त्यांनी चौकशी केल्यावर हा प्रकार उघडकीस आला. गेल्या काही महिन्यात मोनु याने तब्बल ३ लाख रुपयांना गंडा घातला असल्याचे आढळून आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे तपास करीत आहेत.