कोयता व कुऱ्हाडीने वार करुन महाविद्यालयीन तरुणाचा निर्घूण खून, बघा नेमक काय घडलंय ?

बारामती : बारामती तालुक्यातील उंडवड सुपे येथे कारखेलच्या चार ते पाच जणांनी सिनेमा स्टाईल्सने कोयता व कुऱ्हाडीने वार करुन एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा निर्घृण खून केला. आरोपींमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास घडली. विनोद प्रवीण भोसले (वय- 17 वर्षे) असे खून झालेल्या महाविद्यालयीन तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे बारामतीत खळबळ उडाली आहे. विनोद भोसले कॉलेजमधून कारखेलला निघाला होता. त्यावेळी चार ते पाच जणांनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात विनोद गंभीर जखमी झाला. यात त्याचा मृत्यू झाला. उंडवडीच्या बसस्थानकावर उतरलेल्या विनोद याला कारखेलमधीलच चार ते पाच जणांनी कोयता व कुऱ्हाडीने अमानुष वार करुन खून केला. या घटनेतील आरोपींना स्थानिक ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत. यामध्ये तीन जण अल्पवयीन आहेत. तर वैभव राजेंद्र भापकर (वय-18) याला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बारामती तालुक्यातील कारखेल येथील विनोद भोसले हा तरुण श्रीगोंदा येथील सोनिया गांधी पॉलेटेक्निकल येथे इयत्ता बारावीचे (सायको-संगणक) शिक्षण घेत होता. गुरुवारी सायंकाळी पाच वाजता एस.टी. ने घराकडे येत होता. उरवंडी सुपे येथे एस.टी. बसमधून उतरल्यानंतर संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या पुलाखाली दबा धरुन बसलेल्या चार जणांनी विनोदवर कोयता व कुऱ्हाडीने अचानक हल्ला केला.

विनोद चौघांच्या तावडीतून जीव वाचवण्यासाठी जोरात ओरडत बाजूच्या शेताकडे पळाला.मात्र, पळत असताना त्याच्यावर एक वार झाल्याने तो जखमी झाला आणि शेतात आरोपींच्या तावडीत सापडला. त्यानंतर चौघांनी विनोदवर धारदार हत्याराने सपासप वार केले. यामध्ये विनोदचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर ग्रामस्थांनी आरोपींना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपी एकाच गावातील असून गावातील शिवजयंतीच्या कार्यक्रमात आपसात किरकोळ वाद झाल्याच्या पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. त्यासोबत आणखीही अनेक कारणं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच सुपे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपींना ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.