
पुण्यातील हडपसर परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. नवरा बायकोचे भांडणे सुरु असताना मेव्हण्याने शिवीगाळ केली. तेव्हा पतीने आमच्या नवरा बायकोच्या भांडणात तू पडू नको, असे सांगितले.याचाच राग मनात धरून मेव्हण्याने किचनमधील सुर्याने पतीच्या डोक्यात, डोळ्यावर वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे.

ही घटना २६ सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास हडपसर परिसरातील भेकराईनगर येथे घडली आहे.याबाबत दशरथ किसन गोडसे (वय ३६) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी प्रशांत सुभाष नवत्रे (वय २३) याला अटक केली आहे. तर फिर्यादीची पत्नी पल्लवी दशरथ गोडसे हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे २६ सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजता घरी गेले. त्यावेळी त्यांची पत्नी पल्लवी व मेव्हणा प्रशांत यांनी भांडण करुन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तेव्हा फिर्यादी यांनी मेव्हण्यास आमचे नवरा बायकोच्या भांडणात पडु नकोस, असं सांगितले. याचा राग मेव्हण्या आला.

पत्नी पल्लवीने हाताने मारहाण केली. ते पत्नीस विरोध करत असताना मेव्हणा प्रशांतने घरातील धारधार सुर्याने फिर्यादी यांच्या डोक्यावर, डावे डोळ्यावर वार करुन गंभीर जखमी केले. दरम्यान, याबाबत दिलेल्या फिर्यादीवरून हडपसर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.









