मनोज जरांगे यांच्या मेहूणा ‘या’ तीन जिल्ह्यांतून तडीपार

प्रशासनाची मोठी कारवाई, विलास खेडकरसह ९ जणांवर तडीपारीची कारवाई, प्रकरण काय?

जालना – राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटीलही चांगलेच आक्रमक झाले आहेत. पण आता सरकारने त्यांना कोंडीत पकडण्यासाठी मोठी खेळी केली आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी सरकारवर सडकून टिका केली आहे.

मनोज जरांगे यांचे मेहुणे विलास खेडकर यांच्यावर जालना प्रशासनाने तडीपारीची कारवाई केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, समाजासाठी झटणारे जरांगे पाटील आणि दुसरीकडे वाळू चोरीच्या प्रकरणात त्यांचा मेहुणा अडकल्याने अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. मनोज जरांगे पाटील यांचे मेहुणे विलास खेडकर यांच्यासह ९ वाळू माफियांना तडीपार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, तडीपार करण्यात आलेल्या ९ आरोपींपैकी ६ जण हे मनोज जरांगे यांच्या आंदोलनात सक्रिय होते. १ सप्टेंबर २०२३ रोजी झालेल्या हिंसाचारानंतर, बस जाळल्याच्या प्रकरणात विलास खेडकर यांच्यासह अन्य चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. प्रशासनाने विलास हरिभाऊ खेडकर, केशव माधव वायभट, संयोग मधुकर सोळुंके, गजानन गणपत सोळुंके, अमोल केशव पंडित, गोरख बबनराव कुरणकर, संदीप सुखदेव लोहकरे, रामदास मसूरराव तौर, वामन मसुरराव तौर आदींवर तडीपारीची कारवाई केली आहे.

मेहुण्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आल्यानंतर मनोज जरांगे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले, सरकारने माझे तोंड बंद करण्यासाठी मुद्दाम माझ्या पाहुण्यारावळ्याचे नाव तडीपारीच्या यादीत घुसवले असावे. हे १०० टक्के देवेंद्र फडणवीस यांचे षडयंत्र आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.